Political News: चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने रविवारी (दि. 27) त्यांच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर आता शहरातील तीनही मतदारसंघांच्या लढतीचे प्राथमिक चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यापाठोपाठ नाराजांनी बंडाचा झेंडा उचलला असल्याचे समाजमाध्यमांतून समोर आले आहे.
महाविकास आघाडीकडून चिंचवड आणि भोसरीची जागा ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारीसाठी सोडण्यात आली आहे. त्यानुसार, चिंचवडसाठी राहुल कलाटे, तर भोसरीसाठी अजित गव्हाणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत, भोसरी मतदारसंघासाठी आमदार महेश लांडगे, तर चिंचवडसाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार अण्णा बनसोडे यांना पिंपरी राखीव मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे या तीनही मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आता निश्चित झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दुसर्या यादीत, सुलक्षणा शीलवंत-धर यांना पिंपरीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, महाविकास आघाडीकडून भोसरी आणि चिंचवडमध्ये कोण, याबाबतची उत्कंठा ताणली गेली होती. या जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जाणार की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे, याविषयी तर्कवितर्क लढविले जात होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊन 12 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर आता या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
इच्छुकांचा जीव भांड्यात
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरुन तीव्र स्पर्धा रंगली होती. त्यामध्ये ज्यांना तिकीट मिळाले, त्यांचा जीव भांड्यात पडला आहे. तर, ज्यांना तिकीट मिळालेले नाही त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने या बंडाळीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर ते एक मोठे आव्हान असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
आम्ही सर्व एक आहोत..
महायुतीकडून रविवारी (दि. 27) आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकार्यांनी आम्ही सर्व एक आहोत, असा नारा दिला. तसेच, एकदिलाने या निवडणुका लढविणार आहोत. तिन्ही विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवारांचे काम महायुतीचे पदाधिकारी करणार आहेत, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. पत्रकार परिषदेला खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, उमा खापरे, अमित गोरखे, भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष योगेश बहल, कार्तिक लांडगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे आदी उपस्थित होते.