Political News: नेवासा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराची एक फेरी दमदारपणे पूर्ण झाली. तरीही त्यांच्याविरोधात उमेदवार कोण? यावर महायुतीत एकमत होत नसल्याचे दिसते. त्यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याला 48 तासांचा अवधी उरला असतानाही महायुतीचा उमेदवार ठरत नसल्याचे समजते.
विधानसभेचा नेवासा मतदारसंघ स्वतंत्र झाल्यापासून 2014 चा अपवाद वगळता विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांचे सर्वच पातळ्यांवर निर्विवाद एकहाती वर्चस्व राहिल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. साखर कारखाना, शिक्षण संस्था, विविध सहकारी संस्थां तसेच बाजार समिती, पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, अशा महत्त्वांच्या संस्थांवर आमदार गडाख यांची मजबूत पकड असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच ‘पॉवरफुल्ल’ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
दिशाहीन, गटातटात विखुरलेले विरोधक आ. गडाख यांच्यासमोर आव्हान उभे करण्यात नेहमीच निष्प्रभ ठरल्याचे विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने नेहमीच दिसून आले आहे. विकासकामाचा धडाका, नियोजनबद्ध शिस्तप्रिय आणि समर्पित भावनेने झटणारी कार्यकर्त्यांची मोठी फौज, यंत्रणा यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास विरोधक तयार होत नसल्याची चर्चा आहे.
त्यातच नेवाशाची जागा महायुतीमधील भाजप की शिवसेनेने (शिंदे गट) लढवायची यावर एकमत होत नसल्याचे सांगितले जाते. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने निवडणूकपूर्व सर्वे केल्याची चर्चा असून त्यातून आ. गडाख यांना मात देऊ शकेल, असा उमेदवार महायुतीकडे नसल्याचे त्यात मांडण्यात आल्याचे समजते. त्यामुळेच महायुतीकडून आ. गडाख यांच्या विरोधात कोणता पक्ष उमेदवार देणार यावर एकमत होत नसल्याचे समजते. महायुतीकडून संभाव्य उमेदवारांबरोबरच महायुतीतील घटकपक्षांत संभ्रम असल्याचे समजते.