Mumbai Pune Distance: हिंजवडीतील कोंडीमुळे मुंबईचे अंतर वाढले; वाहतूक पोलिस हतबल

Mumbai Pune Traffic jam: वाकड ते पुनावळेदरम्यान चारही अंडरपासमध्ये कोंडी
Pimpari chinchwad
हिंजवडीतील कोंडीPudhari
Published on
Updated on

पंकज खोले

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कचे वाहतूक कोंडीचे ग्रहण काही केल्या सुटण्याचे चिन्ह दिसत नाही. या वाहतूक कोंडीमुळे पुणे- बंगळुरू मार्ग तसेच द्रुतगती मार्गावरील वाहतूकही विस्कळीत होत आहे; त्यामुळे मुंबईकडे जाणार्‍या तसेच मुंबईहून बंगळुरूकडे जाणार्‍या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.

हिंजवडीतील अरुंद रस्ते व दुरवस्थेमुळे वाकड ते पुनावळे दरम्यान वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे. त्यामुळे यालगतचा पुणे-बंगळूर मार्ग आणि विशेष म्हणजे द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे ही कोंंडी भविष्यात मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

हिंजवडी, पुनावळे अंडरपासमध्ये यापूर्वी ‘वर्किंग डे’ ला वाहतूक कोंडी उद्भवत असे; मात्र आता शनिवारी, रविवारदेखील वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांची चाळण, बेशिस्त वाहतूक, पार्किंगचा अभाव, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा फज्जा अशा विविध कारणांमुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Pimpari chinchwad
Pimpari Chinchwad: वाढीव, विनापरवाना बांधकाम केल्यास अधिकचे शुल्क; पालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाकडून दरात वाढ

वाकड ते पुनावळेदरम्यान, पाच भूमिगत मार्गात वाहतूक कोंडी वाढत आहे; तसेच वाकड ते रावेत दरम्यानच्या सात भूमिगत मार्ग हे चिंचवड, रावेत, किवळेकडे जाणार्‍या मार्गास जोडले आहेत. आयटी पार्ककडे जाण्यासाठी या मार्गांचा वापर करावा लागतो; मात्र हे मार्ग अरुंद असल्याने एकाचवेळी दोन वाहने येथून ये-जा करणे शक्य नाही. त्यामुळे सकाळी अन् सायंकाळी येथे मोठी वाहतूक कोंडी उद्भवते. त्यामुळे हिंजवडीतील कोंडीतून सुटल्यानंतर आयटीयन्सना पुन्हा येथे वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.

अखेर स्थानिकांकडून रस्त्याची डागडुजी

पुनावळे ते रावेत या सर्व्हिस रस्त्यावरील खड्डे स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेवून बुजविण्यात आले आहेत. या रस्त्यावर गेल्या दोन दिवसांत चार मोटारी अडकून पडल्या होत्या. या मार्गावर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. अखेर येथील एका हॉटेलचालकाने आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येवून रस्त्याची डागडुजी केली.

Pimpari chinchwad
PCMC: पालिकेच्या रुग्णालयांसाठी कंत्राटी मनुष्यबळ; आयुक्तांकडून स्थायी समितीची मान्यता

रस्ते विकास महामंडळाचे काम अपूर्ण

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे कात्रज बाह्यवळण मार्गाची जबाबदारी आहे. दरम्यान, या विभाागाकडून सेवा रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यात खोदलेले खड्डे आणि कामामुळे चिखल झाला आहे. पावसामुळे काम थांबवल्याचे कबुली येथील तांत्रिक व्यवस्थापकाने दिली. दरम्यान, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

भूमिगत मार्गांची सद्यस्थिती

भुजबळ सब वे

या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. तसेच, या मार्गातून विरुद्ध दिशेने वाहने नेली जातात. हिंवजडीच्या दिशेने जाण्यार्‍या मार्गावर मधोमध खड्डा पडला असून, त्याला बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे; तसेच पुणे-बंगळुरू महामार्गालवरील वाहतुकीचा वेग मंदावतो.

सखाराम वाघमारे सब वे

या मार्गावरदेखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. हिंजवडी येथील वाहनचालक या भूमिगत मार्गाचा वापर करून पुन्हा थेरगाव, औंधकडे जातात. हा थेट थेरगाव गावठाण जोडलेला मार्ग मोटारीसाठी बंद करण्यात आल्याने पुन्हा विरुद्ध दिशेने हिंजवडीकडे जावे लागते.

भूमकर चौक

या परिसरात चारही बाजूने येणार्‍या वाहनांची मोठी वर्दळ असते. चोहोबाजूने येणार्‍या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. लक्ष्मी चौक, विनोदेवस्ती येथून येणारी वाहने आणि पुणे-बंगळूर सेवा रस्त्यावरील वाहनेदेखील येथे येऊन मार्गस्थ होतात. त्यामुळे कोंडी आणखीनच वाढते. या ठिकाणी रस्ता निमुळता असल्याने वाहनांच्या रांगा लागतात.

अशोक नगर चौक

येथील भूमिगत मार्ग अरुंद असल्याने येथेही वाहतूक कोंंडी होते. या मार्गालगत खोदकाम करण्यात आली आहे. तसेच, रस्त्याची दुरवस्था आणि मार्गावर असलेला चिखलामुळे या मार्गावर जाताना वाहनांचा वेग मंदावतो. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात. या ठिकाणी अपुरे वाहतूक कर्मचारी असल्याने चालक बेशिस्तपणे वाहने चालवतात. परिणामी वाहतूककोंडी होते.

श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक

या रस्त्यावर कोंडी कायम असते. परिसराचे शहरीकरण झपाटयाने वाढले मात्र, त्याला जोडण्यार्‍या रस्त्याची दुरवस्था कायम आहे. ताथवडे, पुनावळे भुयारी मार्गाचा विस्तार झाला नाही. हिंजवडीतील जवळपास 40 टक्के कर्मचारी या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्याची कामे सुरू आहेत. मात्र, पावसामुळे कामे अपूर्ण राहिली असून, रस्ता निसरडा झाला आहे. परिणामी, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news