

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका सर्व रुग्णालयांसाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरविण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णालयीन कामकाजासाठी वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, कर्मचारी मनुष्यबळ पुरवठा खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. तसेच, महेशनगर चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाणार आहे.
दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगर सचिव मुकेश कोळप तसेच, विषयाशी संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. (Latest Pimpri News)
आस्थापनेवरील विशेष तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकार्यांना प्रोत्साहनपर वेतानवाढ देण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालय पाठोपाठ जिजामाता रुग्णालयात पदव्युत्तर व पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. नवीन तालेरा रुग्णालय, कासारवाडी व मोरवाडी, नेहरूनगर येथील अभिलेख कक्ष येथे मेस्कोमार्फत सुरक्षारक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महेशनगर चौकातील मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यात येणार आहे. सन 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी क्रमिक पुस्तके खरेदी करण्यात येणार आहे. कस्पटे वस्ती येथील मैलापाणी पंपहाउससाठी नवीन वीजपुरवठा घेण्यात येणार आहे. सेक्टर क्रमांक 30 येथील स्वामी विवेकानंद क्रीडांगणाचे मैदानात रुपांतर करण्यात येणार आहे.
ह आणि ई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सार्वजनिक शौचालयांची दैनंदिन साफसफाई कामे केली जाणार आहेत. पिंपरी गाव येथील मंदिराजवळील नुतनीकरणाचे विद्युत कामे केले जाणार आहे. क्रांतिवीर चाफेकर राष्ट्रीय स्मारकाचे अंतिम टप्प्यातील काम केले जाणार आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीचे आयोजन केले जाणार आहे.
कर संकलन विभागासाठी 10 कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. भोसरी सहल केंद्र उद्यान व अंकुशराव लांडगे नाट्यगृह उद्यान देखभाल व संरक्षण कामकाजास मान्यता देण्यात आली आहे. उद्यान विभागात शोभिवंत रोपे तयार केली जाणार आहेत. पालखी सोहळा, गणेशोत्सव आणि इतर उत्सवांसाठी फिरते स्वच्छतागृह पुरविणे आदी खर्चास आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली.