शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; पवना धरणात 83 टक्के पाणीसाठा
पिंपरी : पवना धरण क्षेत्रात सलग चार दिवस दमदार पाऊस झाल्याने मावळ तालुक्यातील पवना धरण 83 टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह एमआयडीसीच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
पवना धरण परिसरात तसेच, मावळ तालुका आणि पिंपरी-चिंचवड शहरात सोमवार (दि.22) ते गुरूवार (दि.25) असे चार दिवस धो-धो पाऊस पडला. त्यामुळे धरण क्षेत्रातील नाले, ओढे, धबधबे ओसंडून वाहू लागले. अतिवृष्टीमुळे सर्व भाग जलमय झाला होता. चारी बाजूने पाणी वाढल्याने पवना, इंद्रायणी व मुळा नदीला पूर आला होता.
गुरूवारी पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. नदीकाठच्या आणि घरात व हाऊसिंग सोसायटी पाणी शिरलेल्या पाच हजारांपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षितपणे हलविण्यात आले. गुरुवारी सायंकाळनंतर पाऊस थांबल्याने हे पाणी ओसरले. शुक्रवारी (दि.26) शहर पूर्वपदावर आले; मात्र रहिवासी व दुकानदारांचे मोठे नुकसान झाले.
मुसळधार पावसामुळे धरण भरले
सततच्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यामुळे धरणाच्या वीज निर्मिती केंद्राच्या विद्युतगृहातून 1400 क्सुसेक क्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पवना नदीचे पात्र वेगात वाहत आहे; मात्र ते धोकादायक स्थितीत नाही. शनिवारी दिवसभरात 61 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. पावसाची शक्यता लक्षात घेऊन धरणात योग्य प्रमाणात पाणी साठा ठेवला जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षी या दिवशी धरणात 74 टक्के साठा होता.
वर्षभर पुरेल इतके पाणी
पवना धरणातील समाधानकारक पाणी साठ्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह एमआयडीसीचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ते पाणी पुढील वर्षभर पुरेल इतके आहे. नदीकाठच्या गावांना आणि शेतकर्यांना वर्षभर पाणी उपलब्ध होणार आहे.

