
दिपेश सुराणा
पिंपरी : भाजप शहराध्यक्षपदावर शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना संधी देऊन पक्षांतर्गत कलह कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. या माध्यमातून एकीकडे नाराजांची मनधरणी करतानाच पक्षाने घराणेशाहीलाही शह दिला असल्याचे दिसून येत आहे.
भाजप शहराध्यक्षपदासाठी जुन्या आणि नव्या फळीतील पदाधिका र्यांमध्ये मोठी चुरस होती. प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष तथा पक्षप्रवक्ते राजू दुर्गे, शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, संजय मंगोडेकर, विजय फुगे, संतोष कलाटे, शैला मोळक, सुजाता पालांडे आदी प्रमुख इच्छुक होते. त्यातील शत्रुघ्न काटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात पदाधिकार्यांनी गुप्त मतदान केले. पर्यवेक्षक तथा आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश चिटणीस तथा निवडणूक अधिकारी वर्षा डहाळे यांच्या उपस्थितीत हे मतदान झाले.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी पत्नी अश्विनी जगताप यांना चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले. मार्च 2023 मध्ये त्या निवडूनदेखील आल्या. दरम्यान, त्यांचे दीर शंकर जगताप यांना भाजपचे शहराध्यक्षपद मिळाले. त्यामुळे एकाच कुटुंबात आमदारकी आणि शहराध्यक्षपद गेले. त्यामुळे पक्षातंर्गत कलह सुरू झाला. नाराजी वाढली. दरम्यान, नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शंकर जगताप यांना आमदारकीसाठी तिकीट देण्यात आले. त्या वेळी शत्रुघ्न काटे यांनी ही निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेतला होता. त्यांना थांबवत पक्षाने शहर कार्याध्यक्षपद देऊ केले. तसेच, पुढील काळात चांगले पद देण्याचे आश्वासन दिले होते. तो शब्द पक्षाने पाळला असल्याचे दिसून येत आहे
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आगामी चार महिन्यांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक होणार आहे. शहरात भाजपचे 4 आमदार असल्याने पक्षाची ताकद वाढलेली आहे. पक्षाने प्राथमिक सदस्यत्वाचा 3 लाखांचा टप्पा पार केलेला आहे. मंडलाध्यक्षांची निवड जाहीर केली आहे. त्यानंतर आता शहराध्यक्षपददेखील जाहीर झाले आहे. राज्यात महायुतीची सत्ता आहे. मात्र, महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाची सर्व 128 जागा स्वबळावर लढण्याची तयारी आहे. तथापि, पक्षश्रेष्ठींकडून जो निर्णय होईल, त्यानुसार स्थानिक पातळीवर निवडणुका लढविण्याचे नियोजन आहे. नवनियुक्त शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना जुन्या आणि नव्यांची मोट बांधत पक्षाला आगामी महापालिका निवडणुकांसाठी सज्ज ठेवावे लागणार आहे. हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. ते त्यामध्ये कितपत यशस्वी ठरतात, हे येणारा काळच ठरविणार आहे.