

पिंपरी: मावळ लोकसभा निवडणुकीच्या काळात उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात खटला चालविण्याचे आदेश वडगाव मावळ विशेष न्यायालयाने दिले आहेत. खा. बारणे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी हा खटला चालवला जाणार आहे.
बारणे यांनी लोकसभा निवडणुकांच्या वेळी त्यांच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार अनिल भांगरे आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी न्यायालयाकडे केली होती. बारणे यांनी सन 2009 आणि सन 2019 च्या निवडणुकांदरम्यान उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला होता. (Latest Pimpari chinchwad News)
सन 2019 च्या शपथपत्रात बारणे यांनी शैक्षणिक पात्रता दहावी नापास अशी नमूद केली होती. तर सन 2009 मध्ये त्यांनी दहावी उत्तीर्ण, सन 1989 असे लिहिले होते. याशिवाय, त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात पिंपरी न्यायालयातील एक प्रकरण आणि निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा समावेश आहे.
न्यायालयाने शपथपत्रांमधील शैक्षणिक पात्रतेतील विसंगती आणि प्रलंबित प्रकरणांविषयी दिलेली अपुरी माहिती लक्षात घेतली. न्यायालयान याबाबत वडगाव मावळ पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. पोलिसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानंतर डॉ. हरिदास यांनी युक्तिवाद केला.
या निष्कर्षांच्या आधारे न्यायालयाने बारणे यांच्याविरोधात लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 मधील कलम 125-अ अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यास पुरेशी कारणे असल्याचे नमूद केले असून त्याविरोधात प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारदार अनिल भांगरे यांनी सांगितले की, आम्ही सन 2021 पासून या प्रकरणाची तक्रार केली आहे. त्याबाबत न्यायालयाकडे पाठपुरावा केला जात आहे. अखेर न्यायालयाने खटला सुरू करण्यास परवानगी दिली.
वडगाव मावळ न्यायालयात माझ्याविरुद्ध दाखल असलेल्या संबंधित खटल्याबाबत मला अद्याप कुठलीही माहिती नाही, यासंदर्भात सखोल माहिती घेतल्यानंतर मी यावर बोलेन.
श्रीरंग बारणे, खासदार.