

पिंपरी: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याद्वारे नुकतेच राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपट्टी व मालमत्ताकराची 5 कोटींची थकबाकी वसूल झाली, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.
महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत पाणीपट्टी व मालमत्ता कर थकबाकीदारांना ऑनलाईन नोटिसा पाठवल्या होत्या. लोकअदालतीमध्ये पाणीपट्टी व मालमत्ताकराशी संबंधित एकूण 3 हजार 424 प्रकरणे निकाली निघाले. (Latest Pimpari chinchwad News)
त्यात तब्बल 5 कोटी 14 लाख 160 रुपयांची थकबाकी जमा झाली. या लोकअदालतीकरिता नोटिसा पाठवलेल्या मालमत्ताधारकांनी थकबाकीसह चालू वर्षाचा मालमत्ताकराचा भरणा केला आहे. ज्या मालमत्ताधारकांनी ऑनलाईन स्वरूपात मालमत्ताकराचा भरणा केला आहे, त्यांना चालू वर्षाच्या सामान्य रावरील चार टक्के सवलतीचा लाभ मिळाला आहे.
पाणीपट्टी थकबाकीदारांकरिता आकुर्डी फौजदारी व दिवाणी न्यायालय व क्षेत्रीय कार्यालयात तसे, मालमत्ताकर थकबाकीदारांकरिता करसंकलन विभागीय कार्यालय या ठिकाणी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
थकबाकीदारांकडून झालेली वसुली
दोन हजार 481 पाणीपट्टी थकबाकीदारांकडून 3 कोटी 14 लाख 19 हजार रुपयांचे बिल जमा झाला आहे. एकूण 943 मालमत्ता कर थकबाकीदारांकडून 2 कोटी 2 हजार रुपयांचा मालमत्ताकर जमा झाला आहे. त्यामध्ये 834 मालमत्ताधारकांनी ऑनलाईन स्वरूपात मालमत्ताकर भरून 4 टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे, असे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.