

Pimpri News: चालता येत नसलेल्या किंवा अंथरुणास खिळून असलेले ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, दिव्यांगांना आता त्यांच्या घरातूनत मतदान करता येणार आहे. मतदान केंद्रच त्यांच्या घरी येणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने तयारी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी या विधानसभा मतदार संघात तसेच, मावळ मतदार संघात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदानाची वेळी सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांपर्यंत ज्यांना जाता येत नसेल, अशा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि अंथरुणास खिळून असलेल्या रुग्णांसाठी निवडणूक विभागाने घरातूनच मतदान करण्याची सोय केली आहे. त्या मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे म्हणून हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पिंपरी मतदार संघात 60 वर्षांपरील ज्येष्ठ मतदारांची संख्या 71, 837 इतकी आहे. चिंचवडमध्ये 93,915 आणि भोसरीमध्ये 66, 378 इतकी 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. प्रत्येक मतदार संघात 5 ते 6 हजार दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांग तसेच, मतदान केंद्रापर्यंत जाऊ न शकणाऱ्या मतदारांसाठी निवडणूक विभागाने घरीच मतदान करण्याची सोय करून दिली आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांनी घरोघरी जाऊन या मतदारांकडून 12 ड हा अर्ज भरून घेतला आहे. त्यानुसार तीन मतदार संघातील सुमारे 200 मतदारांनी या सुविधेसाठी अर्ज केला आहे. त्यातील पात्र मतदारांसाठी ही सुविधा दिली जाणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम दिवस सोमवारी (दि.4) आहे. त्या दिवशी लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर मतपत्रिका छापाईसाठी पाठविण्यात येतील. साधारण 10 नोव्हेंबरपर्यंत मतपत्रिका छापून होतील. त्यानंतर मतदान पथके संबंधित मतदारांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करतील. ही प्रक्रिया प्रत्यक्ष मतदानाच्या एक दिवस आधी पूर्ण करण्याचे बंधन आहे.
मतदान केंद्रच पोहोचणार घरी
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून संबंधित मतदारांच्या घरी संपूर्ण मतदान केंद्र पोहचते. त्यांच्या घरात मतदान केंद्र उभारले जाते. मतदान करताना गोपनीयता पाळली जाते. या संपूर्ण कामकाजाचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. यावेळी जबाबदार अधिकारी उपस्थित असतात.