पिंपरी/देहूगांव: आषाढी पायीवारीनिमित्त ज्ञानोबा-तुकाराम नामाचा जयघोष, टाळ-मृदंग व हरिनामाच्या गजरात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकारामच्या गजरात संत तुकाराम महाराज 340 व्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी देहूतून प्रस्थान ठेवले आणि पावसाच्या संततधारेत उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले.
भरपावसात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आकुर्डी विठ्ठल मंदिरात मुक्कामी असलेल्या पालखी दर्शनासाठी रात्री गर्दी होती. श्रीक्षेत्र देहूगाव येथील इनामदार वाड्यात सकाळी 9 वाजता शासकीय महापूजा जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या पत्नी सुजाता पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, त्यांच्या पत्नी दैवशाला माने, अप्पर तहसीलदार जयराज देशमुख, यांच्या पत्नी उज्ज्वला देशमुख उपस्थित होते. (Latest Pimpri News)
संतोष वैध यांनी पौरोहित्य केले. या वेळी देहूनगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन दिवटे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, नगरसेविका सपना मोरे, पौर्णिमा काळोखे, रसिका काळोखे, तसेच देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, पालखी सोहळाप्रमुख उपस्थित होते.
शासकीय पूजा झाल्यानंतर फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवण्यात आल्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल... श्री ज्ञानदेव तुकाराम... अशा जयघोषात पालखीने इनामदारसाहेब वाड्यातून प्रस्थान ठेवले. मुख्य कमानीजवळ आली असता संत तुकोबांच्या पालखी रथावर कमानीवरून मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे शिष्य आणि एक विश्वासू भक्त असलेले अनगडशहा बाबा दर्गा येथे दुपारी पालखी सोहळा आला असता, परंपरेनुसार अनगडशहा बाबा दर्गा ट्रस्टच्या वतीने मुसडगे तात्या, बशीर मुलानी, रमजान शेख, फारुख शेख, अफझल मुलानी यांच्या हस्ते श्रीफळ, उपरणे असा मान देण्यात आला.
त्यानंतर श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे बाळासाहेब काशीद, महादेव बिरदवडे, प्रीतम वारघडे, विनायक परंडवाल यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी पानाफुलांनी सजवलेल्या पालखी रथात विराजमान करण्यात आली.
या वेळीदेखील वरुणराजाने हजेरी लावून पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दुपारी दोनच्या सुमारास चिंचोली येथील संत तुकाराम महाराज पादुका मंदिर येथे पालखी आली. श्री शैनेश्वर मंदिर ट्रस्ट आणि श्री जगद्गुरू प्रतिष्ठान यांच्या वतीने व भाविकांनी पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष दत्राय जाधव यांच्या हस्ते आरती करण्यात आली. पालखी सोहळा दुपारी आकुर्डी येथे मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.
उद्योगनगरीत उत्साहात स्वागत
ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात लाखो वारकर्यांच्या उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता पालखी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली. पिंपरीतील भक्ती-शक्ती स्मारक चौकात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी महापालिकेतर्फे पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखी जसजशी पुढे सरकत होती, तसे पाठोपाठ वरुणराजानेदेखील हजेरी लावून पालखीचे स्वागत केले. आनंद सोहळा पाहण्यासाठी शहरवासीयांनी गर्दी केली.
टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात वारकरी विठुरायाचे नामस्मरण करीत होते. ठिकठिकाणी स्वागत व दर्शन घेण्यात येत होते. सायंकाळी पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामास आली. येथे रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी झाली होती. शुक्रवारी पहाटे पूजाविधीनंतर पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.