

पिंपरी: पुणे-पिंपरी परिसरात बँडेड क्वीन म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या कल्याणी ऊर्फ जयश्री उमेश देशपांडे हिला अखेर अमली पदार्थ विरोधी पथकाने आंध्र प्रदेशातून जेरबंद केले. तिच्यावर वेश्याव्यवसाय, खून, पिटा, मोका, फसवणूक यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ईस्ट गोदावरी जिल्ह्यातील राजनगरम येथे लपून बसलेली असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मे 2025 रोजी पाषाण-सुस रोडवरील मकल्याणी कलेक्शनफ या दुकानावर अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. दुकानातून 20 हजार 736 किलो गांजा (किंमत 11 लाख 27 हजार 700 रुपये), मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली. (Latest Pimpri News)
याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत कल्याणीचा पती उमेश देशपांडे (वय 56), चुलत जावई अभिषेक रानवडे (32), आणि पुतणी ऐश्वर्या रानवडे (22) यांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य सूत्रधार कल्याणी देशपांडे ही फरार होती.
दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील आणि सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. स्थानिक खबर्यांकडून माहिती मिळवत तांत्रिक विश्लेषण करून कल्याणी आंध्र प्रदेशात असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने राजनगरम येथे जाऊन तिला अटक केली.
...यांनी केली कारवाई
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलिस अंमलदार जावेद बागसिराज, मयूर वाडकर, शिल्पा कांबळे आणि गणेश कर्पे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
कल्याणी देशपांडे ही केवळ अंमली पदार्थ विक्रीसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय आहे. यापूर्वी ती वेश्याव्यवसाय चालवण्यासाठी कुप्रसिद्ध होती. पोलिस अधिकार्यांचे आदेश धाब्यावर बसवत तिने अनेक वेळा वेश्याव्यवसाय सुरू ठेवला.
तिच्यावर डेक्कन, कोथरूड, चतुःश्रृंगी आणि हवेली पोलिस ठाण्यांमध्ये खून, पिटा अॅक्ट, मकोका, फसवणूक यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. कल्याणीच्या अटकेमुळे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून, आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.