

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात बुधवारी (दि. १५) दुपारी आगीच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. मात्र, नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.
बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राजगुरव कॉलनी येथील अशोक चव्हाण यांच्या बंद घराला अचानक आग लागली. घटनेच्या वेळी चव्हाण कुटुंब घराबाहेर असल्याने घराला कुलूप होते. खिडकीतून धूर येत असल्याचे पाहताच शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. घरातील फ्रीजने पेट घेतला असल्याचे लक्षात येताच जवानांनी सर्वप्रथम विद्युत पुरवठा खंडित केला आणि गॅस सिलिंडर सुरक्षितरीत्या बाहेर काढला. यामुळे घराचा मोठा स्फोट टळला.
घरातील आगीची घटना ताजी असतानाच, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास 'स्वप्न नगरी' परिसरातील वाळलेल्या गवताने पेट घेतला. त्यानंतर तासाभरातच म्हणजेच दुपारी २ च्या सुमारास '२४ कॅरेट (रुबी) सोसायटी' जवळील कोरड्या गवताला भीषण आग लागली. सलग लागलेल्या या आगींमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे अग्निशमन अधिकारी संतोष तेलगे यांच्या नेतृत्वाखाली निरंजन भेगडे, अनुपम सिंग, शुभम काळोखे, अक्षय घोडेकर, ओम भेगडे, आकाश ओव्हाळ आणि शेखर खोमणे या जवानांनी तिन्ही ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली.
तळेगावमधील डीपी रोड, स्वप्न नगरी यांसारख्या अनेक भागांत वाळलेल्या झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. काही बेजबाबदार नागरिक जळती विडी किंवा सिगारेट या झुडपांमध्ये टाकतात, ज्यामुळे आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. प्रशासनाने तातडीने ही वाळलेली झुडपे काढून टाकावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लहू ढेरेंगे यांनी केली आहे.
"वाळलेल्या झुडपांना आग लागल्यानंतर प्रशासनाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासावेत. यामुळे आग नैसर्गिक रित्या लागली की कोणाच्या बेजबाबदारपणामुळे लागली, हे स्पष्ट होईल. दोषींवर कारवाई केल्यास भविष्यात अशा घटनांना आळा बसेल," असे मत माजी नगरसेवक सचिन टकले यांनी व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे स्टेशन भागात म्हाळसकर वाडी येथील महालक्ष्मी पेट्रोल पंप येथे एमएच 14 के ए 3799 या इंधक वाहतूक करणाऱ्या वाहनास बुधवारी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग स्पार्किंगमुळे लागल्याचे प्रथम दर्शनी समजते. वाहनात डिझेल होते. गाडीचा ड्रायव्हर गोरख शिंदे किरकोळ जखामी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलास नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्याकडून माहीती मिळाली असता अग्नीशमन अधिकारी संतोष तेलगेसह कर्मचारी धीरज शिंदे, रियाझ मुलाणी, अनुपम सिंग, शेखर खोमणे, निरंजन भेगाडे, भास्कर माळी, बाळू ठाकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन सुमारे पाऊण तासात आग विझवली. अग्नीशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यामुळे अनर्थ टळला.