

Pimpri News: अत्यंत वाईट परिस्थितीत सुद्धा निष्ठावंत, सच्चे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिले आहेत. त्यामुळे चिंचवडमध्येही सच्चा शिवसैनिक स्वतःहून पुढे येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.चिंचवडमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या साथीने विजयी होतील, असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.
उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी कलाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. दरम्यान, त्यांनी स्थानिक नागरीकांशी, माध्यमांच्या प्रतिनिधिंशी संवाद साधताना ते बोलत होते.
या वेळी संजय राऊत म्हणाले, की काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत कॅम्पेन झाले. यामध्ये लाखभर खुर्च्या होत्या. मात्र, तेथे पाचच हजार नागरिक उपस्थित नव्हते. त्यामुळे 23 तारखेनंतर खरे चित्र सर्वांसमोर असेल. मुख्यमंत्रीपदी आता जरी एकनाथ शिंदे असले तरी 23 तारखेनंतर शिंदे यांचे भविष्य अंधकारमय असेल.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून 160 ते 165 जागा आम्हाला या निवडणुकीत मिळतील, असे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच असेल. महाराष्ट्रात होत असलेल्या शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या सभेला मिळणारा जनतेचा उत्तम प्रतिसाद पाहता जनतेने सत्ता बदल करण्यासाठी ही निवडणूक हाती घेतलेली आहे, असेही राऊत म्हणाले. या वेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेना उबाठाचे मावळ लोकसभा संघटक संयोग वाघेरे, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते.
फेक नॅरेटिव्ह हा आमचा शब्द नाही
देवेंद्र फडणवीस काय बोलतात यावरती आता महाराष्ट्र चालत नाही. फेक नॅरेटिव्हवरती त्यांनी 2014 मध्ये राज्य आणलं. ही संकल्पना आता त्यांच्यावर उलटताना दिसून येत आहे. फेक नॅरेटिव्ह हा त्यांचा शब्द आहे. आमचा नाही.