प्रतिभाकाकी कधी बाहेर आल्या होत्या का? आता नातवाचा पुळका आलाय; अजित पवारांची टीका
Baramati News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि. १६) बारामती दौऱ्यात शरद पवार यांच्या पत्नी काकी प्रतिभा पवार यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही १९९१ पासून मला खासदार-आमदार केले. पण प्रतिभाकाकी कधी बाहेर आल्या नाहीत. आता त्या घरोघरी फिरत आहेत. त्यांना एवढा काय नातवाचा पुळका आला आहे माहित नाही, या शब्दात अजित पवार यांनी आपली खदखद व्यक्त केली.
मी खाताडा-पेताडा, गंजाडी असतो तर गोष्ट वेगळी होती. मी बारामतीचे वाटोळे केले असते, पार बरबाद झालो असतो तर गोष्ट वेगळी होती. ही निवडणूक झाली की मी काकींना या विषयी विचारणार असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले, घरातील दोन उमेदवार उभे राहिले आहेत. लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझे काही म्हणणं नाही. आजपर्यंत तुम्ही नेहमी साथ दिली. तुम्ही लोकसभेला गंमत केली. मी ती मान्य केली. आता गंमत करू नका नाही तर तुमची जमंत होईल.
शरद पवार म्हणाले मी निवृत्त होणार आहे. त्यामुळे पुढचे कोण बघणार आहे हे तुम्हाला माहित आहे. मी टीका करायला गेलो तर तो माझा पुतण्या आहे. मी टीका करायला गेलो की घरातल्यांची उणीदुणी कशी काढायची? हा प्रश्न असतो.
काही जण सांगतात मागे सुप्रियाला मत दिले आता दादांना देणार. तुलना करू नये पण शरद पवार यांच्या तुलनेत माझ्या कारकिर्दीत बारामतीत जास्तीची कामे झाली, असे म्हटले जाते. मी आता काय बोललो तर बोलणार बघा.. हा साहेबांसोबत तुलना करतो. त्यामुळे माझी सगळीकडूनच अडचण होत आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
शुक्रवारी बारामतीत महिला मेळाव्यात माहिलांना ५०० रुपये देऊन आणून बसवले. त्यांना चहा नाही, पाणी नाही ही बारामतीत पद्धत नाही. काम करण्यासाठी नेतृत्वात धमक असावी लागते असेही अजित पवार म्हणाले.

