

पिंपरी: बायोमेट्रिक हजेरी, फेस रिकग्निशन, मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी, सीसीटीव्ही निगराणी, जामर यंत्रणा आणि कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील ११ केंद्रांवर नीट - युजी परीक्षा रविवार (दि. २१) रोजी सुरळीत पार पडली.
नीट परीक्षेसाठी पिंपरी-चिंचवड शहरात सात, देहूरोडमध्ये तीन आणि तळेगाव दाभाडे परिसरात एक असे एकूण ११ केंद्रे निश्चित करण्यात आली होती. यामध्ये पिंपरी येथील संत तुकाराम नगरमधील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भारतीय जैन संघटना स्कूल, एच. ए. स्कूल, चिंचवडगावातील सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, निगडीतील मॉडर्न हायस्कूल, दापोडीच्या सीएमई येथील पीएमश्री केंद्रीय विद्यालय, देहूरोड येतील आर्मी पब्लिक स्कूल, पीएमश्री केंद्रीय विद्यालय क्रमांक १ व २ तसेच तळेगाव दाभाडेजवळील नाणोली तर्फे चाकण येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे या केंद्रांचा समावेश होता.
केंद्रीय शिक्षण मंत्रालय, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) आणि राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेसाठी कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांची आणि परीक्षा कामकाजातील कर्मचाऱ्यांची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात आली. बायोमेट्रिक हजेरी आणि फेस रिकग्निशन प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची ओळख निश्चित केली गेली.
परीक्षा केंद्रांवर शुक्रवारपासूनच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे, घड्याळे आणि जामरची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत होणार असली तरी विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ओळखपत्र, हॉलतिकीट, बायोमेट्रिक पडताळणी आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली.
मोबाईलसह इलेक्ट्रीक उपकरणांवर बंदी
मोबाईल फोन, ब्लूटूथ, स्मार्ट वॉच तसेच इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने आणि इंटरनेट कॅफे परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.
यावेळी खूपच कडक सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परीक्षा केंद्रावर आम्हा विद्यार्थ्यांची पाच ते सहा वेळा तपासणी करण्यात आली. त्यामुळे यंदा तरी काही गोंधळ होणार नाही याची खात्री आहे, असे एका विद्यार्थ्यांने सांगितले.