

पिंपरी: पुणेरी मेट्रोचे मंगळवार (दि. ३) उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल ते हिंजवडी फेज टू असा मेट्रोतून प्रवास केला. या नव्या मार्गावरील पहिले तिकीट मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः घेऊन मेट्रो प्रवासाचा अनुभव घेतला. या वेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि पीएमआरडीएचे महानगर आयुक्त अभिजित चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना मेट्रो मार्ग, स्थानके व प्रकल्पाच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती दिली.
या प्रवासात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी सहभागी झाले होते. या प्रवासाचे विशेष आकर्षण म्हणजे मेट्रोचे संचालन महिला ट्रेन पायलटकडे होते. लीड ट्रेन पायलट प्रगती बिरादार यांनी मेट्रोचे सारथ्य केले. तर, ट्रेन पायलट ऐश्वर्या सूर्यपूजारी यांनी सहाय केले. महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षम सहभागातून आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिलांच्या योगदानाचे दर्शन यानिमित्ताने घडले.
प्रवासादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी शालेय विद्यार्थिनी, आयटीएन्स यांच्याशी संवाद साधला. मेट्रो प्रवासाचा अनुभव, उपलब्ध सुविधा व नव्या मार्गामुळे दैनंदिन प्रवासात होणारे फायदे याविषयी त्यांनी जाणून घेतले. मुख्यमंत्री व मान्यवरांनी हिंजवडी फेज टू मेट्रो स्टेशनपर्यंत सुमारे सहा किलोमीटरचा प्रवास केला. वाहतूक कोंडीत न अडकता सुखद प्रवासाचा अनुभव त्यांनी घेतला. त्यानंतर ते वाहनाने पुढील कार्यक्रमासाठी आकुर्डीकडे रवाना झाले.
पुणेरी मेट्रोचे वैशिष्ट्ये
पुणेरी मेट्रो माण-हिंजवडी-शिवाजीनगर-डिस्ट्रीक कोर्ट अशी २३.२०३ किलोमीटर लांबीची उन्नत मार्गिका आहे. या मार्गावर एकूण २३ स्टेशन आहेत. त्यापैकी १७ स्टेशन खुले करण्यात आले आहेत. उर्वरित स्टेशन टप्प्याटप्प्याने लवकरच खुले केले जाणार आहेत. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात आलेला हा देशातील पहिला मेट्रो प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्च केला आहे. महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देणारी ही पिंक मेट्रो असून, या मार्गावर ९० महिला चालक मेट्रो चालविणार आहेत. प्रकल्पाच्या एकूण मनुष्यबळापैकी ५० टक्के कर्मचारी महिला असणार आहेत. हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला पुणे शहराशी थेट जोडणाऱ्या या मेट्रोमुळे हजारो आयटीयन्स व प्रवाशांना जलद, सुरक्षित व सुविधाजनक प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
आज सकाळी सहापासून मेट्रो सेवेत
माण-हिंजवडी-शिवाजीनगर-डिस्ट्रीक कोर्ट अशी एकूण २३.२०३ किलोमीटर अंतर ही मेट्रो बुधवारी (दि.४) सकाळी सहापासून नागरिकांसाठी धावणार आहे. एकूण २३ स्टेशनपैकी सध्या १७ स्टेशन खुले केले आहेत. उर्वरित सहा स्टेशन टप्प्याटप्प्याने खुले केले जाणार आहेत. प्रवासासाठी किमान १२ आणि कमाल ६२ रुपये तिकीट आहे. दररोज मेट्रो सकाळी सहाला सुरू होणार आहे. डिस्ट्रीट कोर्ट स्टेशन येथून रात्री ११.४० ला शेवटची मेट्रो धावणार आहे. तर, माण येथून शेवटची मेट्रो रात्री १०.३० ला सुटणार आहे.