

गणेश विनोदे
वडगाव मावळ : अलीकडच्या काळात मुलांच्या शिक्षणासाठी पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे असताना स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या आई-वडिलांनी मुलाला ब्राह्मणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत टाकले आणि मुलगा श्लोक भारती याने पाचवीमध्ये शिकत असताना तब्बल 10 प्रकारच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उच्चांकी गुण मिळवला आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थीही यशाचे शिखर गाठू शकतो हे त्याने दाखवून दिले आहे.
श्लोक संतोष भारती हा ब्राह्मणवाडी (साते) येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळेतच सेवा करणारे श्लोकचे वडील संतोष भारती व आई श्वेता भारती यांनी श्लोकला इंग्रजी शाळेत न टाकता मोहितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश दिला आणि पहिलीपासूनच मराठी माध्यमातून शिक्षण सुरू झाले. पहिलीपासूनच विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास एक शिक्षक आणि आई म्हणून श्वेता भारती यांनी घेतला. लहानपणापासून स्पर्धा परीक्षांचे तयारी असल्यामुळे आणि मुळातच बुद्धिमान असलेल्यामुळे श्लोक पहिलीपासूनच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळू लागला. इयत्ता चौथीमध्येदेखील त्याने एन. एस. एस. या परीक्षेत 200 पैकी 200 गुण मिळवून राज्यात पहिला नंबर मिळवला आहे.
त्यानंतर ब्राह्मणवाडी शाळेत प्रवेश घेऊन इयत्ता पाचवीमध्ये शिक्षिका अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवस-रात्र अभ्यास करून त्याने विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. शाळेची वेळ सकाळी साडेदहा असूनही सकाळी सात वाजताच इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू व्हायचा. सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सतत विविध विषयांचे मार्गदर्शन तास सुरू असायचे. इयत्ता पाचवीमध्ये श्लोक याने दहा वेगवेगळ्या प्रकारांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतला आणि विशेष म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये मेरीटमध्ये आला.
एकंदर श्लोकचे अलौकिक यश पाहता पालकांनी जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व काही गोष्टी अगदी मोफत असून,देखील मुलांचीही तितकीच काळजी घेतली जाते. तसेच, अभ्यास घेतला जातो आणि त्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शिक्षक अगदी तळमळीने प्रयत्न करत असतात. फक्त मोठी शाळा आणि जास्त फी भरल्यामुळेच आपला मुलगा खूप चांगली प्रगती करेल, अशा गैरसमजामुळे पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे आहे. परंतु, श्लोकने मराठी शाळेत शिक्षण घेत यशाचे शिखर गाठता येते हे दाखवून आदर्श निर्माण केला आहे.