

पिंपरी: गणेशोत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाचे संरक्षण हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. यंदाही सार्वजनिक गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था, नागरिकांच्या सहकार्याने प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती करण्यासोबत विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
गणेशोत्सव 27 ऑगस्टला सुरू होत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी व नागरिकांसाठी झालेल्या बैठकीत आयुक्त बोलत होते.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अनिल भालसाकळे, माणिक चव्हाण, उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, सहायक आयुक्त अजिंक्य येळे, किशोर ननवरे, तानाजी नरळे, अमित पंडित, निवेदिता घार्गे, अश्विनी गायकवाड , अधिकारी तसेच, मंडळ व संस्थेचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
आयुक्त सिंह यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. गणेश मूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेचा दर्जा वाढवण्यासाठी कृत्रिम हौदांची संख्या 16 वरून 32 वर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाडू मातीच्या मूर्तींसाठी विशेषतः 16 नवीन कृत्रिम हौद उभारले जाणार असून, पीओपी मूर्तींसाठी स्वतंत्र हौदांची व्यवस्था केली जाणार आहे.
शाडू मातीच्या मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर ती माती पुन्हा संकलित करून मूर्तिकारांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. त्यानंतर मूर्तिकार ती माती पुन्हा मूर्तीसाठी वापरू शकणार आहेत. मूर्ती विक्रेत्यांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
मुख्य अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले की, विविध स्वयंसेवी संस्थांकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आलेल्या सूचनांची नोंद घेण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे.
पीओपी व शाडू मातीच्या मूर्ती विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना महापालिकेच्या प्रत्येक विभागाने या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. पीओपी व शाडू मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य देऊन महापालिकेला सहकार्य करावे, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.