

पिंपरी : पुणे-नाशिक रस्त्यावर प्रामुख्याने चाकण भागातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपायोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रस्त्याला अडथळा ठरणारे व अनधिकृत 55 होर्डिंग ‘पीएमआरडीए’कडून हटविण्यात आले. या महिन्यातील सर्वाधिक जलद कारवाई करण्यात आल्याचे पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच, अनधिकृत बांधकामे व अडथळेही दूर करण्यात आले आहे.(Latest Pimpari chinchwad News)
चाकण एमआयडीसी परिसरातील वाढती वाहतूककोंडी, नागरी समस्या, रस्त्याची दुरवस्था आणि वेगवेगळे अडथळे यासाठी खुद्द पालकमंत्री यांनीच कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार, या ठिकाणीच सर्वेक्षण करण्यात आले होते. तसेच, पाहणीदेखील करण्यात आली. या मार्गावरील इंद्रायणी नदीलगतचा मार्गापासून ते चाकणपर्यंत वेगवेगळया ठिकाणच्या होर्डिंगची माहिती गोळा करण्यात आली होती. त्यानुसार जवळपास 60 हून अधिक अनधिकृत होर्डिंग धारकांना नोटीस बजावण्यात आली होती; मात्र संबंधितांनी मुदत उलटूनही अनधिकृत होर्डिंग न काढल्याने अखेर कारवाई करत 55 होर्डिंग जमीनदोस्त केले.
पुणे-नाशिक महामार्ग, चाकण चौक, तळेगाव चाकण शिक्रूपूर, तळेगाव चाकण या परिसरात पाहणी करण्यात आली होती. अवजड व एकावर एक असे होर्डिंग उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यासमवेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग, चाकण नगर परिषद यांचाही या कारवाईत सहभाग होता. यामुळे वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात सुटका होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे-नाशिक मार्गावरील प्रामुख्याने चाकण परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी सर्व्हेक्षण केले होते. त्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनधिकृत होर्डिंग आढळून आले. पीएमआरडीए आयुक्तांच्या आदेशानुसार 55 होर्डिंग हटविण्यात आले. होर्डिंग हटविल्याने वाहतूक कोंडीत घट होईल. ही कारवाई आणखी तीव केली जाणार आहे.
दीप्ती सूर्यवंशी पाटील, सह आयुक्त, पीएमआरडीए.