

पिंपरी : पीएमआरडीएचे मोशी येथील पीआयईसीसी अर्थात कृषी प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर खासगी कंपनीला चालविण्याचा घाट घालण्यात आला आहे. यापूर्वी विस्तारीकरणासाठी ईओआय म्हणजेच (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागविण्यात आला होता; मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर आता हे प्रदर्शन केंद्र खासगी कंपनीचे भले करण्यासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे. दरम्यान, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे पीएमआरडीएच्या जमीन व मालमत्ता विभागाने स्पष्ट केले आहे. (Pimpari chinchwad News)
मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेशन केंद्राचे विस्तारीकरण करण्यात येत होते. 25 एप्रिलला त्यासाठी बैठकदेखील झाली होती. त्यात प्रदर्शन केंद्रातील प्रकल्पासाठी नुकतीच बैठक झाली. या प्रकल्पासाठी ईओआय (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागविण्यात आले होते. हा प्रकल्पासाठी दोन विकसनाकडून त्याबाबत निविदा प्राप्त झाल्या असल्याने त्याचे सादरीकरण करण्यात येणार होते; मात्र त्यावर पुढे निर्णय घेण्यात आला नव्हता.
हे प्रदर्शन केंद्र जवळपास 96 हेक्टर भूखंडावर वसले आहे. या ठिकाणी 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यासाठी मार्च महिन्यात अर्ज मागविण्यात आले होते. हा प्रकल्प पीपीपी तत्वावर उभारण्यात येणार असल्याने मास्टर प्लान तयार करण्यात आला होता. प्रकल्पाचे काम कशाप्रकारे करणार, कामाचा कालावधी इत्यादी नियोजनाविषयी सादरीकरणाच्या सूचना दिल्या; मात्र पुन्हा आता हा प्रकल्प अन्य खासगी कंपनीला चालविण्याचा देण्याबाबत चर्चा झाली आहे. त्यासाठी पुन्हा स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे.
या प्रदर्शन केंद्रासाठी राज्यातून तसेच, इतर राज्यातून मागणी असते. मात्र, तेथपर्यंत पोचण्यासाठी पीएमआरडीएचे मनुष्यबळ कमी पडते. तसेच, या केंद्रासाठी अधिकाधिक ग्राहक मिळण्यासाठी स्वतंत्र अशी यंत्रणा नाही. खासगी कंपनीला दिल्यास त्यातून उत्पन्न वाढू शकेल. तसेच, त्या माध्यमातून हे केंद्र उभारण्यासाठी मदत मिळू शकेल, असे अधिकारी सांगत आहेत.
प्रदर्शनाचा प्रारंभ : सन 2018
दरवर्षी प्रदर्शन भरविण्याची संख्या : 12 ते 15
आजपर्यंत भरवलेली संख्या : 60
क्षेत्र : 5 हजार मीटर झाकलेले केंद्र, 98 हजार चौरस मीटर खुले प्रदर्शन
उत्पन्न : गेल्या दोन वर्षांत सरासरी अडीच कोटी उत्पन्न.