

देहूगाव : शेलारवाडी-देहू-आळंदी राज्य मार्ग (116 कि.मी.) हा मार्ग संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, दरवर्षी आषाढी वारी, कार्तिकी यात्रा, बीज सोहळा यासाठी लाखो भाविक याच मार्गावरुन पायी प्रवास करतात. तसेच, वर्षभर महिनावारी, दर्शनासाठी भाविकांची वर्दळही मोठ्या प्रमाणावर असते; परंतु या रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत खराब आहे. देहूरोड ते झेंडेमळा या 3 किमीच्या भागात 200 पेक्षा अधिक खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. परिणामी वारकरी, भाविक, तसेच तळवडे आयटी पार्क, चाकण व तळेगाव औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अपघात व वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. (Latest pimpari chinchwad news)
संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील जुना पुणे-मुंबई महामार्ग ते झेंडेमळा या महत्त्वाच्या 3 किमी रस्त्याच्या डांबरीकरणासह संरक्षक बाजू पट्ट्यांची दुरुस्ती करण्याच्या मागणीचे निवदेन ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिले. या वेळी त्यांनी या संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. देहू-देहूरोड पंचक्रोशीतील ग्रामस्थ कृती समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले होते. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकार्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत.
या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र आधीच दिले असून, आता महापालिकेच्या प्रस्तावाच्या माध्यमातून डांबरीकरण, खडीकरण व संरक्षक पट्ट्यांचे मुरुमीकरण लवकरच करण्यात येईल, असे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले. पायी वारीची परंपरा अबाधित राखण्यासाठी आणि वाहनचालकांचा त्रास कमी करण्यासाठी देहू-झेंडेमळा रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता प्रशासनाच्या प्रत्यक्ष कृतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्या कार्तिक वारीमध्ये लाखो भाविक या मार्गाचा वापर करणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे. या वेळी बाळासाहेब जाधव, मोरेश्वर घाडगे, संदीप बालघरे, संजय सावंत, चिलुराम दांगट, पांडुरंग बालघरे आदी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन ठोस पावले उचलण्याची मागणी केली. त्यांच्या लेखी निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा नियोजन अधिकारी, देहू कॅन्टोन्मेंट बोर्ड, पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिल्या आहेत.