

पिंपरी: गणेशोत्सवासाठी पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातून कोकणात जाणार्या नागरिकांसाठी एसटीची आरक्षण सुविधा सुरू झाली आहे. 27 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून या पार्श्वभूमीवर एसटी विभागातर्फे कोकणवासीयांसाठी 250 विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात पिंपरी आगारातून दीडशे बसेस धावणार आहेत.
कोकणातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नोकरी, कामाधंद्यासाठी कोकणवासीय इतर शहरांत वास्तव्यास असतात. पण गणेशोत्सवात ते गावी जातात. या चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी दरवर्षी एसटी महामंडळातर्फे राज्यभरातून एसटी बसेस सोडल्या जातात. (Latest Pimpri News)
नागरिकांना गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी आरक्षण करता यावे, यासाठी एसटी महामंडाळाकडून त्याची घोषणा साधारण दीड ते दोन महिने अगोदरच केली जाते. गणेशोत्सव महिन्यावर येऊन ठेपला असताना एसटी प्रशासन जोरदार तयारीला लागले आहे.
एस.टी. प्रशासनाकडून चिपळूण, दापोली, देवरूख, गुहागर, खेड, रत्नागिरी, सावंतवाडी या ठिकाणी जाण्यासाठी पुणे विभागातून 250 बसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेता त्यात आणखी वाढ केली जाणार आहे.
एसटी प्रशासनाने गणेशोत्सवासाठी आरक्षण सुविधा खुली केल्यानंतर पहिल्या आठवड्यातच 18 गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. 27 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असल्याने प्रवासी 24 ते 27 ऑगस्टदरम्यान तिकीट बुकिंगला जादा पसंती देत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
गणेशोत्सवानिमित्त विशेष बससाठी नागरिकांना ग्रुप बुकिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रुप बुकिंग केल्यास नागरिकांना घराजवळून ते इच्छित स्थळी जाण्यासाठी विशेष बस देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या कुटूंबासमवेत किंवा नातेवाईकांसमवेत एकत्र प्रवास करता येणार आहे.