

पिंपरी: पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे हद्द मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वेगवेगळ्या 9 तालुक्यांतून नागरिक, ग्रामस्थ हे विविध कामासाठी पीएमआरडीएमध्ये येत असतात; मात्र अनेकदा या ठिकाणी आल्यावर त्यांना अधिकार्यांची भेट होत नाही. त्यामुळे महानगर आयुक्तांनी नागरिकांना भेटण्यासाठी अधिकार्यांना वेळ ठरवून दिल्या आहेत. अनेकदा त्यावेळी अधिकारी जागेवर नसतात. त्यामुळे आता संबंधित अधिकार्याविरोधी तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांच्या अडचणी, तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कामकाजात सुलभता आणण्यासाठी वेगवेगळया उपाययोजना सुरु आहेत. त्याच अनुषंगाने अधिकार्यांच्या भेटण्याच्या वेळा ठरविण्यात आल्या होत्या; मात्र तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पीएमआरडीए प्रशासनाकडून त्याबाबत कठोर पाावले उचलण्यात येणार आहेत.
प्रत्यक्षात सोमवार ते गुरुवार या चार दिवसांत संबंधित विभागाचे मुख्य अधिकारी हे नागरिकांसाठी उपलब्ध असतील. कामातील अडचणी, समस्या अथवा त्या विभागाच्या तक्रारीच्या अनुषंगाने भेटता येईल. तर, विकास परवानी विभागात नागरिकांना काम होत नसल्याने हेलपाटे मारावे लागत होते.
त्यानुसार एटीपी म्हणजेच सहायक नगररचनाकार हे उपलब्ध असतील. तसेच, इतर विभागातील उपायुक्त व कार्यकारी अभियंता देखील या वेळेत नागरिकांच्या सेवेसाठी असणार आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांनी थेट आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे तक्रारी मांडण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित विभागातील अधिकायांनी याची नोंद घेण्याबाबत सूचना प्रशासनाने मांडल्या आहेत. अन्यथा आयुक्तांकडून आलेल्या परिपत्रकानुसार संबंधित अधिकायांवर कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या तक्रारी, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळा ठरविल्या आहेत. अधिकारी वर्गाने त्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्याबाबतच्या तक्रारी आल्यास आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल.
पूनम मेहता, सह आयुक्त, प्रशासन विभाग, पीएमआरडीए