

पिंपरी: पुण्यातील मानाच्या गणरायाचे दर्शन तसेच, गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून नागरिक मोठ्या संख्येने मेट्रोने जात आहेत. पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर दिवसेंदिवस गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने मेट्र फुल्ल होऊन मुंबईतील लोकल ट्रेनसारखी अवस्था निर्माण झाली आहे. सहकुटुंब रात्री अडीचपर्यंत मेट्रोने ये-जा करीत असल्याचे मेट्रो स्टेशन व परिसरात नागरिकांची वर्दळ दिसत आहे.
पुण्यातील मानाचे गणपती तसेच, देखावे पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड व परिसरातून मोठ्या संख्येने सहकुटुंब तसेच, मित्रमंडळी मेट्रोने जात आहेत. सकाळी सहापासून रात्री दोनपर्यंत मेट्रोतून प्रवास करण्यास मोठी पसंती दिली जात आहे. दिवसेंदिवस मेट्रोतील गर्दी वाढतच आहे. (Latest Pimpri News)
गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी स्टेशनवर सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्यात आली आहे. नागरिकांना वारंवार सूचना देण्यात येत आहेत. पिवळ्या रंगाच्या पट्टीच्या मागे उभे राहण्यास बजावले जात आहे.
प्लॅटफार्मवर एकाच ठिकाणी गर्दी न करण्याची सूचनाही केली जात आहे. प्रवाशांची संख्या वाढल्याने अनेक स्टेशनवरील पिण्याचे पाणी संपल्याचे आढळून आले. तसेच,प्लॅटफार्मवर बाकाची संख्या कमी असल्याने गणपती पाहून थकलेले नागरिक थेट जमिनीवर तसेच, जिन्यावर बसत असल्याचे दिसून येते.
रात्रभर मेट्रो सुविधा
स्वारगेटकडे जाणारी तसेच, स्वारगेट, मंडई व कसबा पेठहून येणारी मेट्रो पिंपरीपर्यंत तुडूंब भरून धावत आहे. गर्दीमुळे अनेकदा डब्याचे दरवाजे लागत नसल्याने स्टेशनवर मेट्रो अधिक वेळ थांबवली जात आहे. अनेकांनी गणेशोत्सवात प्रथमच मेट्रोतून प्रवास केल्याचे सांगितले.
गणेशोत्सवातील पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे तसेच, विक्रमी गर्दीमुळे मेट्रोची प्रवासी संख्या दुप्पटीपेक्षा अधिकने वाढली आहे. नागरिकांची तोबा गर्दी झाल्याने मेट्रोची अवस्था मुंबईतील लोकल ट्रेनसारखी झाली आहे. गणरायाचे अनंत चतुर्दशीला शनिवारी (दि.6) विसर्जन होणार आहे. पुण्यात विसर्जनाचा आकर्षक मिरवणुका रात्रभर सुरू असतात. त्या मिरवणुका पाहता याव्यात म्हणून मेट्रो त्या दिवशी रात्रभर सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे.