पिंपरी: श्रावण महिन्यातील पहिलाच सणानिमित्त महिलांनी नागाच्या प्रतिमेची मनोभावे पूजा केली. श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी साजरी केली जाते. पारंपरिक वेशभूषेतील महिलांची पूजेसाठी वर्दळ दिसून आली. सोसायट्या व उद्यानांत महिलांनी गाणी गात, फेर धरत तसेच झोक्याचा आनंद घेत उत्साही वातावरणात नागपंचमी साजरी केली.
ग्रामीण भागातील सर्वाधिक आनंदाने साजरा होणारा सण आता शहरातदेखील तितक्यात उत्साहात साजरा झाला. घरोघरी नागोबाच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. शेतकर्यांचा मित्र मानल्या जाणार्या नागदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी नागाची किंवा वारुळाची पूजा केली जाते. पिंपरी-चिंचवड शहरातही मंगळवारी (दि. 29) नागपंचमीचा उत्साह दिसून आला. (Latest Pimpri News)
शहर आणि उपनगरांतील महिलांनी पारंपरिक पद्धतीने नागदेवतेची पूजा करून लाह्या व दुधाचा नैवेद्य अर्पण केला. तर, काही ठिकाणी वाळुचा नागोबा तयार करून त्याची पूजा केली. शहरातील काही उद्यानातदेखील पूजा करण्यात आली. पूजा करत आपल्या कुटुंबाच्या आरोग्य, सुख, समृद्धी व संकटापासून संरक्षणाची प्रार्थना नागदेवतेकडे करण्यात आली. काही ठिकाणी नागपंचमीच्या आदल्या दिवशी महिला व तरुणी उपवास करतात. नागपंचमीला तो सोडला जातो.
पुरणाचे दिंड, खिरीचा नैवेद्य
नागदेवतेचे रक्षण व्हावे, यासाठी नागपंचमीच्या दिवशी शेती नांगरत नाहीत. तसेच नागपंचमीला कोणताही पदार्थ करताना चिरला जात नाही, तसेच तवा वापरत नाहीत. म्हणूनच यादिवशी अनेक ठिकाणी पुरणाचे दिंड (उकडून) करणे ही पारंपरिक प्रथा आहे. शहरात विविध भागांमधील नागरिक स्थायिक झाले असल्याने काही ठिकाणी पुरणाचे दिंड, तर काही ठिकाणी पुरणपोळी, गव्हाची खीर, उकडीचे पातोळे यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. घरोघरी नागदेवतेच्या विविध रुपांची पूजा करण्यात आली.