

पिंपरी: पिंपरी चिंचवड परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. त्या स्थितीवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
महापालिकेच्या सर्व आठ क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील नियंत्रण कक्ष 24 बाय 7 सुरू आहेत. तीन शिफ्टमध्ये पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पाण्याचा वाढ होण्याची शक्यता असलेले संवेदनशील भाग ओळखून तिथे जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके पंप, बचाव साहित्य आणि आवश्यक मनुष्यबळाने सज्ज आहेत. (Latest Pimpri News)
अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पंधराहून अधिक बचाव बोटी आणि दोनशे लाईफ जॅकेट सज्ज ठेवली आहेत. पवना आणि इंद्रायणी नद्यांलगत असलेल्या पूरग्रस्त भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने, महापालिकेच्या आरोग्य पथकांना पाण्याद्वारे पसरणार्या रोगांवर लक्ष ठेवण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. संवेदनशील भागात निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तात्पुरत्या निवार्यांची देखील नोंद घेण्यात आली आहे. पाणीपुरवठा व विद्युत विभाग भूमिगत आणि उघड्या पायाभूत सुविधांवर लक्ष ठेऊन आहेत. नागरिकांनी वेळोवेळी सूचनांवर लक्ष ठेऊन सहकार्य करावे व जागरूक राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
साचलेल्या पाण्यात जाणे टाळावे
पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया चॅनेल्सवर वेळोवेळी लक्ष ठेवावे. पाणी साचणे, झाडे पडणे किंवा वीजविषयक तक्रारी असल्यास लगेच नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. महापालिकेने संभाव्य स्थितीचा विचार करून योग्य ती नियोजनबद्ध तयारी केली आहे. नागरिकांनी सतर्क राहून जवळच्या नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाचे नियंत्रण कक्ष क्रमांक
मुख्य पूर नियंत्रण कक्ष (मुख्यालय): 020-67331111 किंवा 020-28331111, अग्निशमन व आपत्कालीन सेवा: 9922501475 किंवा 020-27423333, अग्निशमन नियंत्रण कक्ष अधिकारी- 7757966049, केंद्रीय हेल्पलाइन: 020-67333333 किंवा 9922501451
क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियंत्रण कक्ष
अ क्षेत्रीय कार्यालय - 9922501454, ब क्षेत्रीय कार्यालय - 9922501455, क क्षेत्रीय कार्यालय - 9922501457, ड क्षेत्रीय कार्यालय - 9922501459, ई क्षेत्रीय कार्यालय - 8605722777, फ क्षेत्रीय कार्यालय - 8605422888, ग क्षेत्रीय कार्यालय - 7887879555, ह क्षेत्रीय कार्यालय - 9130050666