

सावेडी: सावेडीतील विविध परिसरातील रस्त्यावरील कचरा उचलला जात नसल्याने अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका हद्दीत समावेश असूनही मूलभूत सुविधा देण्यात येत नाहीत. त्यामुळे मनपा विरोधात नागरीकांमधून संताप व्यक्त होत असून, महापालिकेतील कर्मचार्यांनी नियमित कचरा उचलावा, अशी मागणी केली जात आहे.
सावेडी उपनगरातिल नरहरी नगर कमान, आम्रपाली मंगल कार्यालय समोर, दळवी मळा, तांबटकर मळा, परिसरात घंटागाड्याद्वारे घरोघरी जाऊन ओला - सुका कचरा संकलित केला जातो. मात्र महापालिकेकडून रस्त्यावरील कचरा उचलत येत नसल्याने, रस्त्यावर अस्वच्छतेसह दुर्गंधी पसरून नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. (Latest Ahilyanagar News)
घरी जाताना याच रस्त्यावरून ये -जा करावी लागते. येथील कचर्यामुळे परिसरात मोकाट जनावरे व कुत्र्याचे झुंड कायमस्वरूपी वावरतात. त्यामुळे या जनावरे, कुत्र्यांमुळे स्थानिक नागरिकांना मध्ये भीती राहते.
तसेच सकाळी व सायंकाळी पायी फिरणारे जेष्ठ नागरिक,लहान मुले, महिलांना या भागात अनेकवेळा कुत्र्याने चावा घेतल्याच्या छोट्या मोठ्या घटनाही घडल्या आहेत. त्यासाठी महापालिकेतील कचरा संकलन कर्मचार्यांनी रस्त्यावरील कचरा नियमित उचलून घ्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सावेडी उपनगराचा महापालिका हद्दीत समावेश असून, या परिसरातील रहिवासी 100 टक्के कर भरणारा वर्ग आहे. मात्र या परिसरातील नागरिकांना महापालिकेकडून मूलभूत सुविधा मिळत नाही. आठ - आठ दिवस रस्त्यावरील कचरा न उचलल्याने पावसामुळे त्यातून दुर्गंधी पसरत असून परिसरातील रहिवाशांचे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रेमदान-प्रोफेसर चौकातही कचर्याचे ढीग
सावेडी उपनगरातील सर्वात महत्त्वाच्या प्रेमदान चौक ते प्रोफेसर चौक दरम्यान, रस्त्यावर दोन्ही बाजूने कचर्याचे ढीग साचले आहेत. तसेच महापालिकेचा कचरा संकलनाच्या घंटागाड्या याच परिसरात लावण्यात येतात.
या परिसरामध्ये अनेक खाद्य विक्रेत्यांचे स्टॉल असून, सावेडी उपनगरातील नागरिक परिसरात सकाळी व सायंकाळी येथील खाद्यपदार्थ च्या गाड्यांवर खवय्यांची मोठी गर्दी असते. मात्र येथील परिसरात घंटागाड्याचा डेपो असल्याकारणाने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.