

पिंपरी: सततची वाहतूक कोंडी, पाच-पाच मिनिटांच्या अंतरावर सिग्नल, पाऊस, चिखल व खड्डेमय रस्ते, वायू व ध्वनिप्रदूषण, पार्किंगची अडचण आदी कारणांमुळे मेट्रो प्रवासाला मोठी पसंती दिली जात आहे. मेट्रोने सुरक्षितपणे ये-जा करण्यास प्राधान्य दिले जात आहे.
गणेशोत्सवात सकाळी सहापासून रात्री दोनपर्यंत मेट्रो धावणार असल्याने तसेच पुणे महापालिका भवन, मंडई, कसबा पेठ, स्वारगेट अशा पुण्यातील मध्यवर्ती भागात मेट्रोने सहजपणे ये-जा करणे शक्य झाल्याने मेट्रोला प्रतिसाद वाढून विक्रमी संख्येने वाहतूक होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Latest Pimpri News)
शहरातून पिंपरी ते दापोडी अशी मेट्रो धावते. तेथून पुढे पुण्यात स्वारगेट तसेच रामवाडी व वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास करता येतो. सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत मेट्रो धावत असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातून मेट्रो प्रवासाला गर्दी होत आहे. पिंपरी स्टेशन येथून विक्रमी प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी, नोकरदार, महापालिका व सरकारी कर्मचारी, व्यावसायिक अशा सर्व प्रकारचे नागरिक मेट्रोने प्रवास करण्यास पसंती देत आहेत. तसेच, सायकलस्वारही मेट्रोतून सहजपणे प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे.
गणेशोत्सव सुरू झाला, त्या बुधवारी (दि.27) दिवशी पिंपरी ते स्वारगेट मार्गावर 1 लाख 23 हजार 278 नागरिकांनी प्रवास केला. त्या तिकीट विक्रीतून महामेट्रोला 21 लाख 80 हजार 777 रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर, दुसर्या दिवशी गुरुवारी (दि.28) 1 लाख 13 हजार 241 जणांनी मेट्रोतून ये-जा केली. त्यातून 20 लाख 8 हजार 295 रुपयांचे महामेट्रो तिजोरीत जमा झाले.
गणेशोत्सवात पुणे शहरातील गणेश दर्शन तसेच, देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. पिंपरी-चिंचवडमधील नागरिक सहकुटुंब पुण्यात जातात. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करण्याची संख्या विक्रमी असणार आहे. गेल्या वर्षी मेट्रोला गणेशोत्सवात विक्रमी प्रतिसाद मिळाला होता.
सिव्हिल कोर्ट ते स्वारगेटपर्यंतचा मेट्रो मार्ग तयार झाला आहे. मंडई, कसबा पेठ, स्वारगेट तसेच, वनाज व रामवाडी मार्गावरून पुणे महापालिका भवन मेट्रो स्टेशनपर्यत जाता येणार आहे. या स्टेशनच्या सभोवताली शहरातील प्रमुख गणपती मंडळे आहेत. त्यामुळे नागरिकांनी गणेशोत्सवाच्या काळात मध्यवस्तीतील वाहतूक कोंडी टाळून थेट मंडई, कसबा पेठ व स्वारगेट या भागात पोहचता येणार आहे.
मेट्रो रात्री अकराऐवजी रात्री दोनपर्यंत धावणार आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करून गणपती पाहण्यास जाण्यास मोठा प्रतिसाद मिळणार आहे.
मंडईला न उतरता कसबा पेठ, स्वारगेटला उतरण्याची सूचना
पुण्यातील मंडई परिररात श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती, मंडईचा शारदा गणपती, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, जिलब्या मारुती मंडळ तसेच, इतर प्रसिद्ध मंडळ आहेत. त्यामुळे मंडई मेट्रो स्टेशन येथे उतरण्यास व चढण्यास मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंडई स्टेशन येथे न उतरता कसबा पेठ किंवा स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे उतरण्याची सूचना मेट्रो स्टेशनवरून करण्यात येत आहे.
आजपासून रात्री दोनपर्यंत मेट्रो धावणार
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने पुण्यातील गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी जातात. त्याकरीता मेट्रोची वेळ शनिवार (दि.30) पासून रात्री वाढून अकराऐवजी दोन करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी शनिवारी (दि. 6) मेट्रो रात्रभर धावणार आहे. त्याचा नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
गणेशोत्सवातील वेळ
27 ते 29 ऑगस्ट- सकाळी 6 रात्री 11
30 ते 5 सप्टेंबर- सकाळी 6 रात्री 2
6 ते 7 सप्टेंबर-सकाळी 6 ते दुसर्या दिवशी रात्री 11