Pimpri Rain: पिंपरीत पावसाचे थैमान; 1 हजार 127 नागरिकांचे सुरक्षितपणे स्थलांतर

पिंपरी- चिंचवड शहरातील नदीकाठच्या भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
Heavy rainfall Pimpri
पिंपरीत पावसाचे थैमान; 1 हजार 127 नागरिकांचे सुरक्षितपणे स्थलांतरPudhari
Published on
Updated on

पिंपरी: शहर परिसर व मावळातील जोरदार पावसाने पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहत होते. पात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील नदीकाठच्या भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

महापालिकेच्या पथकांनी नदीकाठच्या 340 कुटुंबातील 1 हजार 127 नागरिकांना महापालिका शाळेत सुरक्षितपणे स्थलांतरित केले. त्या ठिकाणी भोजन व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. हे बचाव कार्य सायंकाळी पाचपर्यंत सुरू होते. पाणी ओसरल्यानंतर नदीकाठचे रस्ते, घाट व परिसर स्वच्छ करण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. (Latest Pimpri News)

Heavy rainfall Pimpri
Accident News: सोमाटणे फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात तळेगावातील युवकाचा मृत्यू

पवना, मुळशी तसेच, इतर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच, पावसाची संततधार कायम असल्याने शहरातील तीनही नद्यांचे पात्र फुगले होते. नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे नदीकाठच्या झोपडपट्या, वस्त्या, पत्राशेड व हाऊसिंग सोसायटीत पाणी शिरले.

तेथील रहिवाशांना महापालिकेच्या पथकांनी सुरक्षितस्थळी महापालिका शाळेतील तात्पुरत्या निवारा केंद्रात हलविले. त्यासाठी पथकाने वाहने तसेच, बसची सोय केली होती. हे बचावकार्य दुसर्‍या दिवशी बुधवारी (दि.20) सायंकाळी पाचपर्यंतसुरू होते.

निवारा केंद्रात नाश्ता व भोजन, पिण्याचे पाणी, निवार्‍याची सोय करण्यात आली होती. आजारी लोकांसाठी वैद्यकीय पथकेही उपलब्ध करून देण्यात आली होती. पाणी ओसल्यानंतर नदीकाठचे रस्ते, परिसर व घाट तसेच, मंदिर येथे जमा झालेला चिखल, कचरा व झाडेझुडपे स्वच्छ करण्यास सुरवात करण्यात आली आहे. पाणी कमी झाल्यानंतर काही नागरिक आपल्या घरी परतले.

दरम्यान, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर आदी अधिकार्‍यांनी विविध भागांतील निवारा केंद्रांना भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. अधिकार्‍यांना आवश्यक सूचना केल्या.

Heavy rainfall Pimpri
Soybean Crop Damage: पावसाचा सोयाबीन, उडीद पिकाला फटका

पाणी उकळून, गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

पावसाचे वातावरण असल्याने नागरिकांनी उकळून, गाळून पाणी प्यावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती लक्षात आल्यास महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन क्रमांक 8888006666, मुख्य नियंत्रण कक्ष क्रमांक 020-67331111 किंवा 020-28331111 किंवा अग्निशमन विभागाच्या 7030908991 या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

नदीकाठच्या भागांवर पथकांची नजर

शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रापासून जवळ असणार्‍या अ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील भाटनगर परिसर, ब क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील लेबर कॅम्प, किवळे, केशवनगर, जाधव घाट, काळेवाडी, ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे निलख, पंचशील नगर, ई क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रामनगर बोपखेल, ग क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील संजय गांधी नगर आणि ह क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे गुरव, लक्ष्मीनगर या भागात पुराचे पाणी शिरण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्या सर्व भागावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत.

आयुक्तांसह वरिष्ठ अधिकार्‍यांकडून नागरिकांशी संवाद

आयुक्त शेखर सिंह तसेच, वरिष्ठ अधिकार्‍यांनी शहरातील विविध निवारा केंद्रांसह नदीकाठच्या भागांची पाहणी केली.आयुक्तांनी भाटनगर, पिंपरी येथील नवनाथ साबळे शाळेस भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला. सांगवीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेतील पूरबाधितांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. मुळा नदीकाठच्या सांगवीतील मुळानगर झोपडपट्टीतील रहिवाशांची चर्चा केली.

तसेच, नदीकाठची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी बोपखेलमधील नदीकाठच्या रहिवासी भागाची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी पिंपरी येथील कमला नेहरू शाळा व फुगेवाडीतील केंद्रास भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी जाधववाडी येथील निवारा केंद्रास भेट देऊन पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. या वेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंगळवारी रात्रीपासून दुसर्‍या दिवशी बुधवारी सायंकाळपर्यंत अधिकारी व कर्मचारी विविध भागांत बचाव कार्यात कार्यरत होते.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय निवारा केंद्रातील नागरिकांची संख्या

अ - 242

ब - 380

ड - 143

ई - 102

ह - 260

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news