Soybean crop damage due to rain
चर्होली: परिसरात काही दिवसांपूर्वी पिकावर पडलेल्या पानआळीने बरेचसे पीक खाऊन फस्त केले आहे आणि आता संततधार पावसाने उरलेसुरले पीकही शेतकर्यांपासून हिरावले गेले. मागील काही दिवस चर्होली परिसरात जोरदार पाऊस झाल्यानंतर मधल्या काळात पावसाने मोठ्या प्रमाणावर ओढ दिली होती.
बराच काळ पाऊस न पडल्यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोग पडायला सुरुवात झाली. विशेषतः पानावरच्या आळीने मोठ्या प्रमाणावर पिके फस्त केली. काही ठिकाणी हुमणीने तर काही ठिकाणी पानआळीने उच्छाद मांडला आहे. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होते. (Latest Pimpri News)
पानआळी रोगाने पानावरच हल्ला झाल्याने प्रकाश संश्लेषणाची क्रिया बंद पडते आणि त्यामुळे रोपाला अन्न न मिळाल्याने रोप मरते. इमामेक्टिन बेंजोएट आणि क्लोरेंट्रानिलीप्रोल या दोन घटकांमुळे पानआळीला प्रतिबंध बसतो, असे वाघेश्वरी कृषी सेवा केंद्राचे निलेश तापकीर यांनी सांगितले.
पिकावरील कीड एवढी चिवट आहे की कितीही औषध मारले तरी जात नाही. मोठ्या प्रमाणावर कीटकनाशक फवारल्याने शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडते. आता पावसाने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. प्रशासनाने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे,असे चर्होलीती शेतकरी अनिल तापकीर यांनी सांगितले.