

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील खड्डे शोधण्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक केली आहे. त्या एजन्सीने शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण करून तसा अहवाल स्थापत्य विभागास दिला जातो. मात्र, त्यावर वेळेत आणि सुचवलेल्या पर्यायानुसार कार्यवाही न झाल्याने त्या सर्वेक्षणाचा खर्च वाया जात आहे. तसेच, खड्डे दुरुस्तीवर महापालिकेकडून दुप्पटीहून अधिकचा खर्च होत आहे.
पावसाळ्यात शहरातील रस्ते खड्डेमय होत असल्याने वाहतूक संथ होऊन कोंडीत भर पडते. त्याबाबत नागरिकांसह नगरसेवकांच्या मोठ्या संख्येने तक्रारी आहेत. दुरुस्तीनंतर पुन्हा खड्डे पडत असल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे महापालिका प्रशासनाची मोठी बदनामी होत आहे. हे रोखण्यासाठी महापालिकेने हे नवीन तंत्रज्ञान स्वीकारले आहे. त्याला रस्ता मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली असे नाव देण्यात आले आहे. जीआयएसप्रणाली असलेल्या वाहनांद्वारे शहरातील सर्व रस्त्यांची छायाचित्रे घेण्यात येतात. खड्डे असलेल्या ठिकाणाची नोंद घेऊन त्यांची दुरुस्ती केली जाते. तसेच, रस्त्यांबाबतचा नकाशा व माहिती संकलित केली जाते.
रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती केली जाणार आहे. रस्ते दीर्घकाल टिकण्यासाठी व त्यावरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. जमा झालेल्या माहितीद्वारे रस्त्यांची स्थिती, दुरुस्ती व देखभाल आदींची सविस्तर माहिती उपलब्ध असल्याने कामावर देखरेख ठेवली जाईल. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडू नयेत, म्हणून पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांचे या माध्यमातून दरवर्षी सर्वेक्षण केले जाणार आहे. वारंवार दुरुस्ती, हलक्या दर्जाचे दुरुस्ती काम टाळण्यासाठी व जबाबदारी सुधारण्यासाठी महापालिकेच्या वर्क मॅनेजमेंट सिस्टीमशी रस्ता मालमत्ता व्यवस्थापन प्रणालीला जोडण्यात येणार आहे.
डिसेंबर २०२४ पासून हे काम सुरू करण्यात आले आहे. ते काम तीन वर्षांसाठी देण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी दोन महिने सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण केले गेले. हे शहरातील दुसरे सर्वेक्षण होते. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला. त्याचा अहवालही स्थापत्य विभागास प्राप्त झाला आहे. मात्र, त्यावर तातडीने कारवाई न झाल्याने तसेच, एजन्सीने सुचवलेल्या दर्जानुसार दुरुस्ती काम न झाल्याने शहरभरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिक खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात छोटे-मोठे अपघात होत आहेत.
शहर खड्डेमुक्त करण्याचा शेखर सिंह यांचा दावा फोल
पिंपरी-चिंचवड शहरात नवीन तंत्रज्ञान वापरून सर्व खड्डे बुजवले जातील. त्याची सर्व जबाबदारी ठेकेदारांवर असणार आहे. त्या नवीन तंत्रज्ञानामुळे शहर खड्डेमुक्त होईल, असा दावा तत्कालिन आयुक्त शेखर सिंह यांनी केला होता. मात्र, त्यांचा दावा फोल ठरला आहे. गेल्या वर्षी खड्डे दुरुस्तीवर तब्बल १०० कोटींहून अधिकचा खर्च झाला होता. यंदाच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात त्यासाठी वाढ करून तब्बल १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
स्मार्ट सिटी, पाणीपुरवठा, विद्युत, ड्रेनेज विभागांकडून खोदकाम सुरूच
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी, महापालिकेच्या पाणीपुरवठा, विद्युत, ड्रेनेजलाईन, शहरी दळणवळण यासह वेगवेगळ्या विभाग तसेच, महावितरणकडून रस्ते खोदकाम केले जाते. खोदकाम केल्यानंतर रस्त्यांची चांगल्या प्रकारे दुरूस्ती न झाल्याने पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. तसेच, महामेट्रोच्या कामामुळे निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाण पुलापर्यंतचे सर्व्हिस रस्ता खराब झाला आहे.
शहरातील १९५ किलोमीटरचेे रस्ते खराब असल्याचा अहवाल
खासगी संस्थेने सर्वेक्षण करून महापालिकेच्या स्थापत्य विभागास अहवाल सादर केला आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांतील एकूण ४३२ रस्त्यांवर खड्डे आढळून आले आहेत. एकूण १९५.१०७ किलोमीटर अंतराचे रस्ते खराब आहेत. त्या रस्त्यांची कश्या प्रकारे दुरुस्ती करायची याचा पर्यायही संस्थेने दिला आहे. संपूर्ण रस्ता खोदायचा की केवळ एक स्थर द्यायचा असा पर्यांय दिले जातात. अहवालानुसार तातडीने त्याबाबत कार्यवाही केल्यास खर्च मर्यादित होतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने खर्च दुप्पटीहून अधिक होत आहे.
आतापर्यंत १ हजार ६०९ खड्डे बुजवल्याचा दावा
शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडे आतापर्यंत २ हजार १६४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १ हजार ६०९ खड्डे बुजविण्यात आले आहेत. खड्ड्यांपैकी ५५६ खड्डे कोल्ड मिक्स, २३ बीबीएम, ७५४ जीएसबी, १२९ पेव्हिंग ब्लॉक आणि १५६ खड्डे काँक्रीटच्या माध्यमातून बुजविण्यात आले आहेत. उर्वरित ५५५ खड्ड्यांची दुरुस्तीकाम सुरू आहे, असे स्थापत्य विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. असे असले तरी, शहरात खड्डे कायम असल्याचे चित्र आहे.
अहवालानुसार रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती
सर्वेक्षण अहवालानुसार स्थापत्य विभागाकडून रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती केली जात आहे. त्यानुसार, संबंधित रस्त्यांच्या निविदा काढल्या जातात. त्यानुसार काम करून घेतले जाते. मात्र, जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पुन्हा खड्डे निर्माण होत आहेत. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यावर महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत, असे महापालिकेचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.