Pimpari Chinchwad Police | मिशन वॉन्टेडमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ : मोहिमेत ‘अँटी गुंडा स्कॉड’ अव्वल, २४७ आरोपींची धरपकड

१३२ गुणांसह पहिला क्रमांक ; युनिट तीन दुसरे, युनिट एक व दोन तिसऱ्या क्रमांकावर
Pimpari Chinchwad Police | मिशन वॉन्टेडमुळे  गुन्हेगारी वर्तुळात खळबळ : मोहिमेत ‘अँटी गुंडा स्कॉड’ अव्वल, २४७ आरोपींची धरपकड
Pimpari Chinchwad Police | मिशन वॉन्टेडमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ : मोहिमेत ‘अँटी गुंडा स्कॉड’ अव्वल, २४७ आरोपींची धरपकड
Published on: 
Updated on: 

पिंपरी : पाहिजे आणि फरारी आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी राबविलेल्या १५ दिवसांच्या ‘मिशन वॉन्टेड’मुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाणी आणि गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत २४७ आरोपींना पकडण्यात यश मिळाले आहे. गुन्हे शाखेच्या अंतर्गत स्पर्धेत अँटी गुंडा स्कॉडने १३२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. युनिट तीनने १०३ गुणांसह दुसरा, तर युनिट एक आणि युनिट दोनने प्रत्येकी ८४ गुण मिळवत संयुक्त तिसरे स्थान मिळविले.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या आरोपींची संख्या मोठी असल्याने २७ जुलै ते १२ ऑगस्टदरम्यान विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मोहिमेपूर्वी २ हजार ६३५ पाहिजे आणि ३२ फरारी असे एकूण २ हजार ६६७ आरोपी पोलिसांच्या रडारवर होते. त्यानंतर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके कामाला लावण्यात आली. आरोपींचे जुने पत्ते, नातेवाईक आणि संपर्कातील व्यक्ती यांचा माग काढण्याबरोबरच उपलब्ध माहितीच्या आधारे शोधमोहीम तीव्र करण्यात आली.

या कारवाईत पोलीस ठाण्यांनी १४०, तर गुन्हे शाखेने १०७ आरोपी पकडले. याशिवाय मृत्यू, प्रकरण, अटकपूर्व कारवाई किंवा दुबार नावे अशा कारणांमुळे ७९ प्रकरणे कमी झाली आहेत. त्यामुळे एकूण ३२६ प्रकरणांचा निपटारा होऊन आता २ हजार ३४१ आरोपींचा शोध बाकी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

गुन्हे शाखेच्या कामगिरीत अँटी गुंडा स्कॉडने मोक्कातील सहा, गंभीर गुन्ह्यांतील नऊ आणि इतर गुन्ह्यांतील सहा अशा २१ आरोपींना पकडत १३२ गुणांची मजल मारली. विशेष म्हणजे, संख्येच्या बाबतीत युनिट तीनने सर्वाधिक २४ आरोपी पकडले; मात्र गुन्ह्यांचे स्वरूप आणि त्यासाठी निश्चित केलेल्या गुणांकनामुळे अँटी गुंडा स्कॉडने बाजी मारली. युनिट तीनच्या कारवाईत मोक्कातील एक, गंभीर गुन्ह्यांतील आठ आणि इतर गुन्ह्यांतील १५ आरोपींचा समावेश आहे.

फरारांच्या गोटात धडकी

विशेष मोहिमेमुळे अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपींच्या हालचालींवर मर्यादा आल्या असून, फरारांच्या गोटात धडकी भरल्याचे चित्र आहे. जुन्या गुन्ह्यांच्या फायली पुन्हा उघडून आरोपींचा माग काढण्यात आल्याने काही आरोपींना आपली सुरक्षित ठिकाणे बदलावी लागल्याची चर्चा आहे. दरम्यान, अद्याप मोठ्या संख्येने आरोपी पकडायचे असल्याने ‘मिशन वॉन्टेड’ची धार कायम ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस ठाण्यांमध्ये हिंजवडीची बाजी

पोलीस ठाण्यांच्या कामगिरीत हिंजवडी पोलीस ठाण्याने १९ आरोपी पकडून ८४ गुणांसह पहिला क्रमांक मिळविला. पिंपरीने १२ आरोपी पकडून ५७ गुणांसह दुसरे, तर सांगवीने १० आरोपी पकडून ५४ गुणांसह तिसरे स्थान मिळविले. त्यापाठोपाठ संत तुकारामनगर आणि वाकड प्रत्येकी ४८, निगडी ४२, चिखली ३७, तळेगाव दाभाडे ३३, चाकण उत्तर ३० आणि आळंदी पोलीस ठाण्याने २७ गुण मिळविले आहेत .

गुन्हे शाखेत कोण कितव्या क्रमांकावर?

अँटी गुंडा स्कॉडने १३२ गुणांसह पहिला, युनिट तीनने १०३ गुणांसह दुसरा, तर युनिट एक आणि युनिट दोनने प्रत्येकी ८४ गुणांसह संयुक्त तिसरा क्रमांक मिळविला. युनिट चारने ६९, मालमत्ता/दरोडा विरोधी पथकाने २४, अमली पदार्थ विरोधी पथकाने १८ आणि खंडणी विरोधी पथकाने तीन गुण मिळविले.

“गंभीर गुन्हे करून फरार झालेल्या तसेच दीर्घकाळापासून पाहिजे असलेल्या आरोपींना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेने चांगली कामगिरी केली आहे. अद्याप फरार असलेल्या आरोपींचा शोधही त्याच तीव्रतेने सुरू राहणार आहे. गुन्हा करून फरार राहिल्यास पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार, हा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.”

— विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news