

पिंपरी: गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. शहरातील संभाव्य समाजकंटक, दंगलखोर आणि मिरवणुकीत गोंधळ घालणार्या सराईतांवर पोलिसांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 163 (2) अंतर्गत 510 जणांना नोटिसा बजावल्या आहेत.
मिरवणुकांमध्ये दिसू नका, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देऊन पोलिसांनी गणेश विसर्जनासाठी कडक संदेश दिला आहे. (Latest Pimpri News)
शहरातील गणेशोत्सवाची व्याप्ती
पिंपरी-चिंचवड शहर हा गणेशभक्तांचा गड मानला जातो. यंदाच्या वर्षी शहरात तब्बल 2 लाख 65 हजार 27 घरगुती गणेशमूर्ती व 2 हजार 146 सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी झाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने गणेशमूर्ती असल्याने विसर्जना वेळी मिरवणुकीत लाखो भाविकांचा उत्साह उसळतो.
या प्रचंड गर्दीला नियंत्रित करणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. विशेषतः रात्री उशिरापर्यंत चालणार्या मिरवणुकींमध्ये भांडणं, दारूचे नशेत होणारे प्रकार, ध्वनिप्रदूषण किंवा दंगल घडण्याचा धोका टाळण्यासाठी यावर्षी पोलिसांनी अधिक कडक भूमिका घेतली आहे.
गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडणे हा उद्देश
गणेश विसर्जना वेळी मोठी गर्दी होते. समाजविघातकांनी त्याचा गैरफायदा घेतल्यास शहरातील शांतता बिघडू शकते. त्यामुळे 510 सराईतांना 163 (2) अंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत. मिरवणुका, गर्दीच्या ठिकाणी हजर राहू नका, अन्यथा तात्काळ कारवाईला सामोरे जावे लागेल, असे नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे. गणेशोत्सव निर्विघ्न व शांततेत पार पाडणे, हा यामागचा उद्देश आहे.
मागील अनुभवावरून यंदा कारवाई
शहरातील प्रमुख मंडळांच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात. ढोल-ताशा पथके, शोभायात्रा, नृत्याविष्कार, लेझर शो यामुळे मिरवणुकीला रंगत येते. मात्र, याच गर्दीत काही उपद्रवी तणाव निर्माण करतात. मागील वर्षांत काही भागात झालेल्या गोंधळाच्या घटनांचा अनुभव लक्षात घेऊन यंदा पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे.
कलम 163(2) काय सांगतो ?
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (2) ही तरतूद पोलिस किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना तत्काळ आदेश देण्याचा अधिकार देते. सामान्यतः कोणत्याही व्यक्तीविरुद्ध आदेश देण्यापूर्वी त्याला नोटीस देऊन आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते.
मात्र, जर परिस्थिती अत्यंत तातडीची असेल आणि वेळ नसेल, तर अधिकारी एकतर्फी आदेश जारी करू शकतो. याचा अर्थ असा की, जर पोलिसांना खात्री असेल की एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीमुळे मिरवणुकीत गोंधळ, हिंसाचार किंवा शांतता भंग होण्याची शक्यता आहे, तर त्या व्यक्तीस थेट मिरवणुकीत सहभागी होऊ नका, अशी कायदेशीर नोटीस देता येते.
एखाद्या व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी न मिळाल्याने हा अधिकार दडपशाहीसारखा वाटतो. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणे हा सांस्कृतिक-अध्यात्मिक हक्क आहे. त्यावर बंधने आल्याने लोकशाही धोक्यात येऊ शकते. अशा नोटिसा देण्यापूर्वी संबंधितांची बाजू ऐकून घेणे आवश्यक आहे.
- संदीप कोरी, अध्यक्ष, मानवाधिकार संघटना
आगामी गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनी सर्व तयारी केली आहे. वेगवेगळ्या कलमांखाली प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये काहीजणांना 162 (2) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. संबंधितांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येणार नाही.
- विशाल हिरे, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड