पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील 3 हजार 97 शिधापत्रिकाधारकांनी जानेवारी ते जून या कालावधीत रेशन दुकानातून धान्य उचलले नसल्याने त्यांचे धान्य वाटप बंद करण्यात येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माहितीनुसार या लाभार्थ्यांना अपात्र ठरवून त्यांच्या जागी नव्या पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना धान्य वितरण सुरू केले आहे. दरम्यान, त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे अधिकार्यांचे म्हणणे आहे. (Latest Pimpri News)
रेशन विभाग अ (निगडी), ज (पिंपरी) आणि फ (भोसरी) या तीन झोनमध्ये विभागलेला आहे. एकूण 4,89,387 लाभार्थींना रेशनचा लाभ दिला जातो. यामध्ये 3 हजार 710 अंत्योदय योजना लाभार्थी आणि 88 हजार 641 शिधापत्रिकाधारक अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थी आहेत. खर्या गरजू लाभार्थींना मोफत रेशनचा लाभ मिळवून देणे हा या कारवाईचा उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पिंपरी कार्यालयांतर्गत लाभार्थ्यांची अंतिम पडताळणी सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर संबंधितांच्या नावावरून धान्य वाटप कायमस्वरूपी थांबविण्यात येईल, अशी माहिती ज झोनचे परिमंडळ अधिकारी यांनी दिली. केंद्र सरकारकडून अपात्र लाभार्थींची यादी राज्यांना पाठविण्यात आली.