पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘अ‍ॅम्बिस’वर भर; क्राईम कंट्रोलिंगसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची जोड

सात हजारांवर गुन्हेगारांच्या बायोमेट्रिक नोंदी
artificial intelligence
‘एआय’
Published on
Updated on

पिंपरी : शहरातील गुन्हेगारांवर जादाचा वचक ठेवण्यासाठी तसेच गुन्ह्यांची उकल जलदगतीने करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अत्याधुनिक ‘अ‍ॅम्बिस’ (Automated Multi-Modal Biometric Identification System) प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केला आहे. याद्वारे, मागील दोन वर्षांत 7 हजार 506 आरोपींच्या बायोमेट्रिक नोंदी करण्यात आल्या असून, भविष्यात अधिकाधिक नोंदी करण्यात येणार आहेत. संशयीत गुन्हेगार तसेच आरोपींच्या बोटांचे ठसे, चेहर्‍याची संरचना आणि डोळ्यांच्या नमुन्यांच्या आधारे त्यांची ओळख पटवून गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची ठरत असून, पोलिसांना आता एका क्लिकवर गुन्हेगाराची सर्व माहिती मिळू शकणार आहे.

सीसीटीएनएस प्रणालीशी जोडणी

महाराष्ट्र ‘अ‍ॅम्बिस’ प्रणाली वापरणारे देशातील पहिले राज्य आहे. ही प्रणाली सीसीटीएनएस (Crime and Criminal Tracking Network and Systems) प्रकल्पाशी जोडण्याचे काम सुरू आहे. लवकरच संपूर्ण देशभरातील पोलिसांना एका क्लिकवर आरोपींचा डेटा मिळू शकणार आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये सर्रास गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांवरही नियंत्रण ठेवणे शक्य होईल.

गुन्हेगारी नियंत्रणासाठी एआयचा वापर

पोलिस प्रशासन आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि डेटा अ‍ॅनालिटिक्सच्या मदतीने गुन्हेगारीचा ट्रेंड ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. ‘अ‍ॅम्बिस’ प्रणालीतून मिळणार्‍या बायोमेट्रिक डेटाचा उपयोग करून गुन्हेगारी प्रवृत्ती, ठिकाण आणि संशयास्पद हालचाली ओळखता येणार आहेत. विशेषतः टोळ्यांच्या हालचाली ट्रॅक करण्यासाठी ही प्रणाली मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरणार आहे. भविष्यात एआय-आधारित चेहरा ओळख तंत्रज्ञान थेट स्मार्ट सिटी प्रकल्पातील सीसीटीव्ही नेटवर्कला जोडण्याचा विचार आहे, त्यामुळे संशयित व्यक्ती ओळखणे आणखी सोपे होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

अशी असते‘अ‍ॅम्बिस’ प्रणाली

‘अ‍ॅम्बिस’ ही संगणकीकृत प्रणाली आरोपींच्या बायोमेट्रिक ओळखीचे (बोटांचे ठसे, चेहरा, डोळ्यांची संरचना) डिजिटल स्वरूपात संकलन करते. पोलिस विभागाच्या मुख्य सर्व्हरला जोडलेल्या या प्रणालीमुळे कोणत्याही पोलिस ठाण्याला गुन्हेगारांची माहिती सहज मिळते. यामुळे गुन्हेगारांनी वेगवेगळ्या नावाने ओळख लपवण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना शोधणे सोपे होते. गुन्हेगारीच्या अन्वेषण प्रक्रियेत हे एक प्रभावी साधन बनले आहे.

‘गुन्ह्यांची उकल अन् न्यायप्रक्रियेस गती

पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात याआधीही फिंगरप्रिंट विभाग कार्यरत होता, मात्र तो केवळ बोटांचे ठसे तपासण्यापुरता मर्यादित होता. ‘अ‍ॅम्बिस’ प्रणालीमुळे आरोपींच्या चेहर्‍याच्या आणि डोळ्यांच्या स्कॅनिंगद्वारेही ओळख पटवता येते. याचा थेट फायदा सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या संशयितांच्या चेहर्‍यांची पडताळणी तात्काळ करण्यासाठी होतो. एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेले ठसे किंवा सीसीटीव्हीतील चेहरा या डेटाबेसशी ताडून त्वरित माहिती मिळवता येते.

गुन्हेगारांना ओळख लपवणे कठीण

पूर्वी गुन्हेगार वेगवेगळ्या नावाने पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न करीत. मात्र,‘अ‍ॅम्बिस’ प्रणालीमुळे बोटांचे ठसे, डोळ्यांची आणि चेहर्‍याची संरचना डिजिटल स्वरूपात कायमस्वरूपी साठवली जाते. त्यामुळे एकदा पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये आलेला आरोपी दुसर्‍या ठिकाणी वेगळी ओळख सांगून सुटण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा त्वरित शोध लागू शकतो. शिवाय, याचा उपयोग गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठीही केला जातो.

पिंपरी-चिंचवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मागील दोन वर्षांत 7,506 आरोपींच्या बायोमेट्रिक नोंदी या प्रणालीमध्ये घेतल्या आहेत. भविष्यात कोणत्याही गुन्ह्याच्या तपासात या डेटाचा उपयोग होईल. संशयितांची पार्श्वभूमी तपासण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. दरवर्षी या डेटामध्ये वाढ होत असून, लवकरच शहरातील सर्व संशयित आणि आरोपींच्या नोंदी या प्रणालीमध्ये असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news