

संतोष शिंदे
पिंपरी: रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अश्लील इशारे करत ‘शुक-शुक’ आवाज देत देहविक्रय करणाऱ्या महिलांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील विविध भागांमध्ये दररोज दोन ते तीन महिलांवर कारवाई केली जात असून, या कारवाईचे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात समर्थन होत आहे.
शहरातील मुख्य रस्ते, चौक, बसथांबे आणि आयटी पार्क परिसरात काही महिला उभ्या राहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना हातवारे, इशारे करून आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारामुळे महिला, कॉलेजच्या मुली तसेच लहान मुलांसमोरही विचित्र परिस्थिती निर्माण होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. तसेच अशा प्रकारांमुळे वाहतूक व्यवस्थेलाही अडथळा निर्माण होत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशाने विशेष पथके तयार करून अशा महिलांवर लक्ष ठेवत कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच, स्थानिक पोलिसांनाही कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सामाजिक संघटनांकडून समर्थन
पोलिसांच्या या कारवाईला सामाजिक स्तरावरही पाठिंबा मिळत आहे. रस्त्यावर उघडपणे होणारे असे प्रकार समाजातील नैतिक वातावरणावर परिणाम करणारे ठरतात. पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्य असून, अशा प्रकारांना आळा घालणे आवश्यक आहे. मात्र, या महिलांचे समुपदेशन आणि पुनर्वसनही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत सामाजिक संघटनांकडून व्यक्त होत आहे.
कठोर शिक्षेची तरतूद
या महिलांवर नव्या भारतीय न्याय संहिता अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन, सार्वजनिक त्रास आणि शिस्तभंग यांसारख्या कलमांनुसार कारवाई केली जाते. अशा प्रकरणांमध्ये दंड किंवा अल्पकालीन कारावासाची तरतूद आहे. बहुतांश गुन्हे जामीनपात्र असल्याने संबंधित महिलांना तात्पुरत्या स्वरूपात जामीन मिळतो. मात्र, वारंवार गुन्हा आढळल्यास न्यायालयाकडून अधिक कठोर भूमिका घेतली जाऊ शकते.
गंभीर आजारांचा धोका
या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे नशेचा वापर. काही महिला नशेच्या अवस्थेत ग्राहकांशी संपर्क साधतात. ग्राहकांकडून त्यांना अधिक दारू पाजली जाते आणि त्यानंतर कोणतीही सुरक्षितता न पाळता लैंगिक संबंध ठेवले जातात. त्यामुळे एचआयव्हीसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
निराधार महिलांची संख्या लक्षणीय
या महिलांपैकी अनेकजणी सामाजिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील आहेत. नवऱ्याने सोडलेल्या, विधवा किंवा निराधार अवस्थेत असलेल्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. आर्थिक अडचणींमुळे काही महिला या व्यवसायाकडे वळल्याचे दिसून येते, तर काहींनी स्वतःहून हा मार्ग स्वीकारल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी या महिला उभ्या असतात, त्या परिसरातील काही लॉजशी त्यांचे संबंध असल्याचेही निदर्शनास आले आहे.
नागरिक समाधानी; पुनर्वसनाचा प्रश्न कायम
शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. रस्त्याने कुटुंबासोबत किंवा मुलांसोबत जाताना अशा प्रकारांना सामोरे जावे लागत होते. या कारवाईमुळे सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. या मोहिमेमुळे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अश्लील वर्तनाला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असली, तरी संबंधित महिलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे चित्र आहे.
सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन सहन केले जाणार नाही. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सातत्याने कारवाई केली जात आहे. कोणत्याही प्रकारचा बेकायदा व्यवसाय किंवा सार्वजनिक शिस्त बिघडवणारी कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत.
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड