

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार सदस्यीय एक प्रभाग हा 49 हजार ते 59 हजारांचा असणार आहे. सरासरी 53 हजार मतदार एका प्रभागात असतील. प्रभाग रचनेचे काम महापालिकेच्या निवडणूक विभागाने सुरू केले असून, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
गुगल अर्थ मॅपचा आधार घेण्यात येणार
शहराची सन 2011 ची जनगणना विचारात घेऊन प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यादृष्टीने प्रगणक गट (ब्लॉक) जुळवून प्रभाग तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी गुगल अर्थ मॅपचा आधार घेण्यात येणार आहे. प्रभाग रचना तयार करण्यासाठी 37 दिवसांची मुदत आहे. (Latest Pimpri News)
त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांच्यासह स्थापत्य, नगररचना, बांधकाम परवानगी आदी विभागाचे अधिकार्यांचा समावेश आहे. प्रभाग रचनेचे प्रत्यक्ष कामकाज महापालिकेने सुरू केले आहे. त्यासाठी प्राथमिक बैठका झाल्या आहेत. आयुक्तांनी फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागांची माहिती घेतली. त्याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली.
शहराची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 17 लाख 29 हजार 359 आहे. त्यानुसार, प्रत्येक प्रभागात किमान 49 हजार आणि कमाल 59 हजार मतदार संख्येचा समावेश केला जाणार आहे. सरासरी 53 हजार मतदारांचे प्रमाण एका प्रभागात असतील.
त्या दृष्टीने प्रभागरचना नकाशा तयार केला जाणार आहे. त्यासाठी 2011 च्या जनगणनेची माहिती तपासणे, स्थळ पाहणी करणे, गुलल मॅपवर प्रभाग नकाशे तयार करणे आदी प्रक्रिया केली जाणार आहे. त्या कामकाजासह प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षर्या करणे, ही सर्व प्रक्रिया 7 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
22 जुलैला प्रभाग रचना प्रसिद्ध होणार !
प्रारूप प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे 8 ते 10 जुलैला पालिका आयुक्त सिंह यांच्याकडून पाठविला जाईल. आयोगाकडून प्रभाग रचनेला मान्यता मिळाल्यानंतर 22 जुलैला प्रभागरचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर त्या दिवसापासून दहा दिवस म्हणजे 31 जुलैपर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जातील.
त्यावर 1 ते 11 ऑगस्ट अशी म्हणजे 11 दिवस सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकार्यांनी अंतिम केलेली प्रभागरचना 12 ते 18 ऑगस्ट या कालावधीत निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविली जाईल. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभागरचना अधिसूचनेद्वारे 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रसिद्ध केली जाईल. तेव्हा प्रभाग रचनेचे कामकाज संपणार आहे.
प्रभाग रचनेनंतर आरक्षण सोडत
पिंपरी-चिंचवड शहरातील चार सदस्यीय 32 प्रभागांची रचना 4 सप्टेंबरपर्यंत अंतिम होईल. त्यानंतर महिला तसेच, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (एसटी आणि एसटी) जागेसाठी आरक्षण सोडत काढली जाईल. त्यानंतर प्रभाग रचनेनुसार मतदारयादी तयार करण्याचे काम केले जाईल. अखेरीस निवडणूक कार्यक्रम वेळापत्रक जाहीर होईल. त्याचा कालावधी दीड ते दोन महिने इतका असू शकतो.
शहरात 16 लाख 75 हजार 654 मतदार
पिंपरी विधानसभा : 3 लाख 91 हजार 607 मतदार
चिंचवड विधानसभा : 6 लाख 63 हजार 622 मतदार
भोसरी विधानसभा : 6 लाख 8 हजार 425 मतदार
भोर विधानसभा (ताथवडे) : 12 हजार मतदार
पिंपरी-चिंचवड शहरात चार सदस्यीय 32 प्रभाग रचना तयार करण्यासाठी प्राथमिक कामकाज सुरू करण्यात आले आहे. प्रभागरचना तयार करताना चिखली-तळवडेपासून सुरुवात करून सांगवी येथे समाप्ती केली जाईल. त्या क्रमाने प्रभागांना क्रमांक दिले जातील. आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रभागरचना तयार केली जाईल. त्यादृष्टीने मनुष्यबळ नेमले जाणार आहे. या कामकाजाच्या समितीचे अध्यक्ष आयुक्त आहेत.
- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, निवडणूक विभाग, महापालिका