

पारगाव : यंदाच्या थापलिंग यात्रेत बदगी बेलापूरचा पेढा भाव खाऊन गेला. बदगी बेलापूर (ता. अकोले) येथील पारंपरिक व चविष्ट पेढा या भागात प्रसिद्ध आहे. काळाच्या ओघात अनेक पारंपरिक पदार्थ मागे पडत असतानाही बदगी बेलापूरचा पेढा मात्र आपली ओळख टिकवून आहे. विशेषतः विविध यात्रा, धार्मिक उत्सवांत या पेढ्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
यात्रेच्या निमित्ताने गावोगावी येणारे भाविक, नातेवाईक व पाहुणे प्रसाद म्हणून ‘बेलापूरचा पेढा’ हमखास खरेदी करतात. शुद्ध दूध, साजूक तूप आणि पारंपरिक पद्धतीने तयार केल्यामुळे या पेढ्याची चव इतर पेढ्यांपेक्षा वेगळी ठरते. त्यामुळे हा पेढा प्रसाद, भेटवस्तू तसेच खास प्रसंगी नेण्यासाठी लोकांची पहिली पसंती बनला आहे. यंदाच्या थापलिंग यात्रेत बेलापूरचा पेढा खरेदी करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती.
हा पेढा सध्या काही मोजक्या व्यावसायिकांकडूनच तयार केला जात असला, तरी गुणवत्तेमुळे आणि जुन्या चवीच्या आठवणींमुळे ग््रााहकांची मागणी कायम आहे, असे पेढा विक्रेत्या मीराबाई पोपट महाले व गणेश महाले यांनी सांगितले.
यात्रांच्या काळात ते पेढा विक्रीसाठी खास स्टॉल्स लावतात. बदगी बेलापूरच्या पेढ्याने गावाची ओळख जपली असून ही पारंपरिक चव पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. थापलिंग यात्रेत बदगी बेलापूरचा पेढा खरेदी करण्यासाठी भाविकांनी केलेली गर्दी.