

पिंपरी: निगडी प्राधिकरणातील बीएसएनएलच्या डक्टमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २७) सकाळी घडली. विशेष म्हणजे, याच ठिकाणी वर्षभरापूर्वी अशाच प्रकारे तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एकाच ठिकाणी पुन्हा दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मनोज बाबुराव शिंदे (२६, रा. नाशिक जेलरोड, मूळ रा. सिद्धेश्वर, ता. औंढा, जि. हिंगोली) आणि अमोल अशोक शिंदे (२०, मूळ रा. सिद्धेश्वर, ता. औंढा, जि. हिंगोली) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील निर्मल विला बंगल्यासमोर, लोकमान्य हॉस्पिटलशेजारी, लोकमान्य हॉस्पिटलकडून भेळ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बीएसएनएलच्या डक्टमध्ये कामाच्या निमित्ताने दोन कामगार उतरले. मात्र, डक्टमध्ये उतरल्यानंतर श्वास गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला असण्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन व वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिमंडळ एक व दोनचे पोलिस उपायुक्त, पिंपरी विभाग व चाकण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त तसेच निगडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनही बोलावण्यात आली असून कार्यवाही सुरू आहे.