

पिंपरी : हिंजवडी फेज एक येथील ॲटलास कॉपको कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका २३ वर्षीय अभियंता तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. २८) दुपारी घडली. पियुष अशोक कवडे (२३, रा. स्वप्नशिल्प बंगला, ज्यूडो समोर, वाकड, पुणे. मूळ रा. परशुराम गंगाराम रोड, आकाशवाणी जवळ, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या अभियंता तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष ॲटलास कॉपको कंपनीत गेल्या वर्षभरापासून अभियंता पदावर कार्यरत होता. दरम्यान, सोमवारी सकाळी कंपनीच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी मारून त्याने आयुष्य संपवले. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन तपास सुरु केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट सापडली असून, त्यामध्ये कोणताही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी ती वैयक्तिक कारणांमुळे केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.