

पिंपरी: लोकशाहीचा उत्सव केवळ मतदानापुरता मर्यादित न राहता तो सामाजिक, पर्यावरणीय व नागरिकांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरावा, या हेतूने शहरात निसर्गसंवर्धन, स्वच्छता, आरोग्य व शाश्वत विकासाचा संदेश देणारी नावीन्यपूर्ण मतदान केंद्रे उभारण्यात आले आहेत.
निवडणुकीसाठी गुरूवार (दि. 15) मतदान होणार आहे. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण आठ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक याप्रमाणे एकूण आठ नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. नावीन्यपूर्ण मतदान केंद्रांमध्ये सौर ऊर्जा, हरित मतदान केंद्र, ओला व सुका कचरा वर्गीकरण, तंदुरुस्त रहा, आरआरआर, पाणी वाचवा, स्वच्छ हवा कृती आराखडा आणि पंचतत्त्व अशा महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला आहे. या मतदान केंद्रात संबंधित विषयानुसार सजावट, माहितीपर फलक व जनजागृती संदेशांच्या माध्यमातून मतदारांमध्ये पर्यावरणीय व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा उद्देश आहे.
सौर ऊर्जा
या विषयावर आधारित मतदान केंद्र आकुर्डी येथील न्यू पुणे पब्लिक स्कूल येथे साकारले आहे. त्याद्वारे सौर ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. चिंचवड येथील आचार्य आनंद ऋषींजी स्कूल येथे हरित मतदान केंद्र बनवण्यात आले आहे. त्याद्वारे पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला आहे.
ओला व सुका कचरा वर्गीकरण
या विषयातून स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले असून, ही संकल्पना मोशी येथील सावित्रीबाई फुले शाळेत राबवण्यात आली आहे. चिखलीतील जाधववाडी प्राथमिक विद्यालय केंद्रावर आरआरआर या संकल्पनेद्वारे शाश्वत विकासाचा संदेश देण्यात आला आहे.
तंदुरुस्त रहा
या विषयातून नागरिकांना आरोग्यदायी जीवनाचा संदेश दिला गेला आहे. ते केंद्र पिंपळे सौदागर येथील जी. के. गुरुकुल स्कूल येथे आहे. पाणी वाचवा या विषयातून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. थेरगाव येथील प्रिन्स सोसायटीत स्वच्छ हवा कृती आराखडा या विषयातून स्वच्छ व निरोगी हवेचा संदेश देण्यात आला आहे. स्त्री शक्ती सबलीकरण या विषयीचे केंद्र उभारण्यात आले आहेत. कासारवाडी येथील महापालिका शाळेत पंचतत्त्व या विषयातून पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांचा समतोल जपण्याचा संदेश दिला गेला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिली आहे.
महिला कर्मचाऱ्यांचे पिंक बूथ
शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पिंक बूथ स्थापन करण्यात आले आहेत. महिला मतदारांना सुरक्षित, सुलभ व उत्साहवर्धक वातावरणात मतदान करता यावे, यासाठी या बूथचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. या बूथवर महिला कर्मचारी, स्वयंसेविका व सुरक्षारक्षक तैनात ठेवण्यात आले आहे. मतदारांना महिलांकडून आवश्यक ते मार्गदर्शन व मदत केली जाणार आहे. पिंक बूथच्या माध्यमातून महिलांमध्ये मतदानाबाबत जागृती वाढवणे, त्यांच्या अडचणी दूर करणे. लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे या उद्देश आहे. या बूथवर स्वच्छ, आकर्षक व सुरक्षित वातावरण ठेवण्यात आले आहे. महिला मतदारांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.