Pimpri News: महापालिका आयुक्तांच्या ‌‘त्या‌’ वक्तव्यावरून शहरभरातून संताप

पालिकेच्या चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या वतीने मुंबई येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीयस्तरावर गायन व वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
Pimpri News
Pimpri NewsPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहराच्या जागतिक ओळखीबद्दल केलेले विधान अत्यंत निंदनीय आणि बेजबाबदार आहे. ज्या शहराने शून्यातून विश्व निर्माण करून जागतिक पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण केले, त्या शहराबद्दल अशी मुक्ताफळे उधळणे हा येथील नागरिकांच्या भावनांचा अपमान आहे, असे मत व्यक्त करीत शहरातील लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

पालिकेच्या चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या वतीने मुंबई येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीयस्तरावर गायन व वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्या संदर्भातील सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहराला जगात कोण ओळखत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Pimpri News
Pimpri-Chinchwad Rain: पावसामुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या; महापौर रवी लांडगे यांचे आदेश

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली तसेच, चापेकर बंधूंसारख्या क्रांतिकारकांच्या बलिदानाने पावन झालेली पिंपरी-चिंचवड ही ऐतिहासिक भूमी आहे. औद्योगिकनगरी असलेल्या शहर जगाच्या नकाशावर ठळकपणे चमकत आहे. टाटा मोटर्स, मर्सिडीज बेंझ, बजाज ऑटो आणि फोक्सवॅगनसारख्या असंख्य कंपन्यांमुळे आज शहराची ओळख सातासमुद्रापार आहे. अशा शहराबद्दल जगात कोणी ओळखत नाही, असे विधान करणे म्हणजे या मातीचा आणि संस्कृतीचा अवमान आहे, असे मत अनेकांनी व्यक्त करत आयुक्तांचा निषेध केला आहे.

प्रलंबित विकासकामांवर लक्ष केंद्रित करा

भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना सल्ला दिला आहे. त्यांनी शहराची ओळख शोधण्यापेक्षा पालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यावर आणि प्रलंबित विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे. शहराची ओळख पुसण्याचा किंवा येथील भूमिपुत्रांच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नये.

आयुक्तांचे वक्तव्य गैरजबाबदार

आमदार अमित गोरखे म्हणाले, की आयुक्तांनी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, गैरजबाबदार आणि शहराच्या अस्मितेला धक्का देणारे आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवडच्या गौरवशाली इतिहासाचा आणि औद्योगिक प्रगतीचा गांभीर्याने अभ्यास करावा, त्यानंतरच जबाबदारीने विधाने करावीत. शहराची जागतिक ओळख ही कष्टाने निर्माण झाली असून, अशा प्रकारची अनाठायी वक्तव्ये करणे अत्यंत दुर्दैवी आहे.

आयुक्तांनी विकासाचा वारसा जपावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे म्हणाले, की आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा वारसा जपावा. आयुक्तांनी वादाऐवजी विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे. शहराचा इतिहासाचा अभ्यास करावा.

Pimpri News
Bhor Rain Damage: भर पावसात कृषिमंत्री भरणेंकडून नुकसानाची पाहणी; अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश

जनतेची माफी मागावी

सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर म्हणाले, की आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल पिंपरी-चिंचवडच्या जनतेची बिनशर्त जाहीर माफी मागावी. भविष्यात अशा प्रकारे शहराची प्रतिमा मलीन होणार नाही, याची प्रशासकीय स्तरावर दखल घेतली जावी. एका वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्याकडून झालेल्या या बेजबाबदार वर्तवणुकीची शासनस्तरावर नोंद घेतली जावी. अन्यथा शहराच्या अस्मितेसाठी आंदोलन छेडण्यात येईल.

आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त करावी

शहराबाबत केलेल्या वक्तव्याबाबत शहरवासीयांची भावना लक्षात घेऊन महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलगिरी व्यक्त करावी, असा सल्ला सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी आयुक्तांना दिला आहे. गायन व वादन स्पर्धा आयोजनातील एक छोटा भाग असलेल्या संस्थेसोबत महापालिकेची तुलना करणे अयोग्य आहे. ही बाब शहरवासीयांना खटकारी आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

पुणे शेजारी असल्याने पिंपरी-चिंचवडचे नाव नवीन पुणे असे करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात पुढे आला होता. मात्र, पिंपरी-चिंचवडची स्वतंत्र ओळख असल्याने त्या निर्णयास कडाडून विरोध करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहराबाबत बोलून आयुक्तांनी चूक केली आहे. ते आयएसएस दर्जाचे अधिकारी असून, त्यांची सेवानिवृत्ती येथेच होणार आहे. त्यामुळे त्यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासावर लक्ष देऊन शहराचा नावलौकीक आणखी वाढावा, असे सल्लाही प्रशांत शितोळे यांनी आयुक्तांना दिला आहे.

आयुक्तांनी चूक मान्य करावी

शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) गटनेते विश्वजित बारणे म्हणाले, की, शहरात विकासाचे चांगले काम करण्याची भूमिका आयुक्तांनी ठेवावी. शहराच्या अस्मितेला, अस्मितेविषयी कोण बोलत असेल तर तेवढ्याच आक्रमकपणे शिवसेना म्हणून विरोध केला जाईल. आपण चुकला आहात हे आयुक्तांनी मान्य करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news