

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात खासगी वाहनांची वाढती संख्या, औद्योगिकीकरण तसेच, बदलेले राहणीमान यामुळे हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. पीएम 10 व पीएम 2.5 धुलीकणांचे वार्षिक सरासरी प्रमाण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकापेक्षा जास्त नोंदविले गेले. त्यामुळे शहरातील अनेक भागांतील हवामान दूषित झाल्याचे महापालिकेच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालातून समोर आले आहे. (Pcmc Latest News)
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने तयार केलेला अहवाल नुकताच आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे सादर करण्यात आला. त्या अहवालाच्या निकर्षानुसार शहराचे हवामान बिघडले असल्याचे त्यातून दिसून येते.
मागील वर्षांतील जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांत हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) चांगला या श्रेणीत होता. तर, एप्रिल, मे, ऑक्टोबर 3 महिन्यात समाधानकारक आणि नोव्हेंबर ते मार्च या 5 महिन्यात मध्यम प्रदूषित या श्रेणीत एक्यूआय आढळून आला आहे. त्यामुळे शहर प्रदूषित झाल्याचे स्पष्ट होत आहे.
शहराचे हवामान साधारणपणे उष्ण कटीबंधाप्रमाणे आहे. सन 2024-25 मध्ये शहरामध्ये भोसरी येथे सर्वात जास्त जुलै महिन्यात 218.0 मिलिमीटर इतका तर, चिंचवडमध्ये 197.5 मिलिमीटर इतका पाऊस नोंदवला गेला. महापालिकेच्या एकूण 19
मैलाशुद्धीकरण केंद्राद्वारे 332 एमएलडी प्रतिदिन इतक्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. या प्रकल्पाद्वारे प्रक्रिया केलेले 31 एमएलडी पाण्याचा प्रतिमहिना पुनर्वापर रस्ते धुण्यासाठी तसेच, धूळ नियंत्रण प्रणालीमध्ये व उद्यानासाठी वापरले जाते.
महापालिकेच्या उद्यान व पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून विविध संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, नागरिकांच्या सहभागाने विविध ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य नियमितपणे तसेच, विविध अभियानांच्या माध्यमातून केले जाते. सन 2024-25 मध्ये एकूण 1 लाख 73 हजार 576 झाडे लावण्यात आली.
शहराने जलनि:स्सारण (ड्रेनेजलाइन) व्यवस्थापनाच्या बाबतीत 100 टक्के निकष पूर्ण करत सलग दुसर्यांदा वॉटर प्लस मानांकन प्राप्त केले आहे. यामध्ये घराघरातून गोळा केलेल्या घनकचरा व्यवस्थापनातून सुक्या कचर्यापासून उभारलेला वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, राडारोड्यावर प्रक्रिया करणारा सी अॅण्ड डी प्रकल्प, एमआरएफ युनिटस, ओला-सुका कचरा ट्रान्स्फर स्टेशन, मोशीतील बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प, कंपोस्टिंग युनिटस, पुनर्वापर प्रकल्प, बायोगॅस युनिटस व विकेंद्रित प्रक्रिया केंद्रे यांचे विशेष योगदान राहिले आहे.
सन 2024-25 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत नोंदणीकृत वाहनांच्या संख्येत 36 टक्के वाढ झालेली दिसून येत आहे. शहरात नोंदणी होणार्या एकूण वाहनांपैकी 3.5 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण दिसून येत आहे. सन 2024-25 पर्यंत साधारणपणे 50,902 इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे. सन 2024-25 मध्ये पीएमपीएलच्या ताफ्यात स्वत:च्या मालकीच्या व भाडेतत्वाच्या एकूण 1 हजार 948 बसेस आहेत. जून 2025 अखेर सीएनजी बसेची संख्या 225 इतकी तर, ई-बसेची संख्या 490 इतकी आहे.
आजपर्यंत एकूण 3 लाख 51 हजार 542.43 मेट्रिक टन घरगुती कचर्यावर मोशी डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यापासून 13 कोटी 69 लाख 40 हजार 859 युनिटस विजेची निर्मिती झाली आहे. तसेच, बांधकाम राडारोडा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये 39 हजार 827 मेट्रिक टन कचर्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. हॉटेल वेस्ट टू बायोगॅस या प्रकल्पामध्ये एकूण 3 हजार 593 मेट्रिक टन हॉटेल वेस्टवर प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यापासून 1 लाख 12 हजार 249 किलोग्रॅम बायोगॅसची निर्मिती करण्यात आली आहे.