

पिंपरी: आशिया कप 2025 मधील बांगलादेश वि. श्रीलंका सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या दोन भावांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने शनिवारी (दि. 20) छापा टाकून कारवाई केली. पिंपरी कॅम्पमधील ‘कुणाल रेस्टोबार’मध्ये हा बेकायदा बेटिंगचा अड्डा सुरू असल्याचे समोर आले आहे.
गिरीश मूलचंद इसरानी (32), विकी मूलचंद इसरानी (31, दोघे रा. रिव्हर रोड, मेन बाजार, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी पेट्रोलिंगदरम्यान मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील सहायक निरीक्षक दत्तात्रय गुळींग, हवालदार नितीन लोखंडे, गणेश हिंगे, गणेश कोकणे यांना कुणाल रेस्टोबार येथे संशयास्पद हालचाली दिसल्या. (Latest Pimpari chinchwad News)
पोलिसांनी चौकशी केली असता दोघे व्यक्ती लॅपटॉप-मोबाइलच्या साहाय्याने क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन बेटिंग खेळताना आढळून आल्या. दोघांनाही ताब्यात घेऊन पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. मालमत्ता विरोधी पथक तपास करीत आहे.
मोबाईल, बेटिंगचे साहित्य जप्त
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि साहित्य जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांवर ऑनलाइन बेटिंग वाढत चालले असून, युवक मोठ्या प्रमाणावर यामध्ये अडकत आहेत. त्यामुळे गोपनीय माहिती काढून कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे पथकप्रमुख वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्याकडून सांगण्यात आले.