

पिंपळे गुरव : येथील मोरया पार्क सोसायटी परिसरातील लेन नंबर 2 मध्ये गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे परिसरातील नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. योग्य निचऱ्याची सोय नसल्याने रस्त्यांवर दुर्गंधी पसरली असून. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.(Latest Pimpari chinchwad News)
वाहतूककोंडीत भर
मोरया कॉलनी परिसरात अरुंद रस्ते आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रस्त्यावरुन ये-जा करताना अक्षरशा कसरत करावी लागते. दुचाकी, रिक्षांमुळे बऱ्याच वेळा वाहतूककोंडी होते. लेन नंबर दोनमध्ये शाळा असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यावरच साचत आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्यातून मुलांना शाळेत जावे लागते. त्यामुळे त्यांचा गणवेश, बूट, दप्तर पूर्णपणे भिजते. विद्यार्थ्यांना शाळेत सोडताना पालकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो.
दुर्गंधीने नागरिक त्रस्त
याच ठिकाणी मोकळ्या जागेच्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा साठल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यावरच ड्रेनेजचे चेंबर तुटलेल्या अवस्थेत असून, त्यामधून दुर्गंधी पसरते. पावसाचे पाणी योग्य प्रकारे वाहून जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने अनेकदा पाणी तासन्तास एकाच ठिकाणी साचून राहते. या साचलेल्या पाण्यातून जावे लागत असल्यामुळे स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला
उपाययोजना करण्याची मागणी
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते. पावसाच्या पाण्याचा योग्य रीतीने निचरा व्हावा, डासांचा प्रादुर्भाव कमी व्हावा आणि परिसरातील दुर्गंधी दूर व्हावी, यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिक व पालकांकडून करण्यात येत आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी येथे कोणतीही व्यवस्था नाही. कचरा व ड्रेनेजच्या दुर्गंधीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी.
सुरेश सकट, स्थानिक नागरिक
पावसाळ्याच्या दिवसांत दररोज शाळेत जाताना पाण्यातून चालावे लागते. गणवेश व बूट पूर्णपणे भिजतात. अशा परिस्थितीत आम्ही अभ्यास कसा करायचा?
एक विद्यार्थी
मोरया पार्कमध्ये स्ट्राँम वॉटरची पाइपलाइन नाही. नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत नदीकडे जात होता. नागरिकांनी भराव टाकल्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे पाणी साचून राहते. -
प्रसाद देशमुख, स्थापत्य ड क्षेत्रीय कार्यालय