

दापोडी : फुगेवाडी गावकर्यांना गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम दफनभूमीकडे ये-जा करण्यासाठी रस्त्याच्या प्रश्नासाठी झगडावे लागत होते. महापालिकेकडून या कामासाठी बजेट मंजुरी देण्यात आलेले असताना केवळ रेल्वे प्रशासनाकडून अंतिम मंजुरी मिळण्यासाठी दिरंगाई होत होती. आता मात्र या कामास गती मिळणार आहे. रेल्वे विभागाकडून कामास मंजुरी मिळाल्याने येत्या दोन महिन्यांत येथील कामात सुरुवात होणार असल्याचे महापालिका स्थापत्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पूर्वीपासून फुगेवाडीतील नागरिक हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम दफन भूमीकडे जाण्यासाठी रेल्वे रुळाचा वापर करत होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने मंजुरी देण्यास व काही वर्षांपासून येथून ये-जा करण्यासाठी मार्ग बंद केला होता. परिणामी पन्नास पावलावर असलेल्या स्मशान भूमी व दफन भूमीकडे जाण्यासाठी फुगेवाडीकरांना दापोडीमार्गे वळसा घालून जावे लागत होते. रेल्वे प्रशासनाकडून या सर्व भागाला लोखंडी खांब व पत्रे लावून रुळावरून होणारी ये-जा बंद केली आहे.
सद्यस्थितीत गावकर्यांना स्मशानभूमीकडे जाण्यासाठी साधारण एक ते दीड किलोमीटर वळसा घालून जावे लागत आहे. यासाठी रेल्वे प्रशासन, महापालिका, स्थानिक आमदार, खासदार यांच्याकडे येथील काम लवकर सुरू करावे यासाठी पाठपुरावा सुरू होता. दापोडी येथील सिद्धार्थनगरच्या धरतीवर भुयारी मार्गाची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती.
गेल्या दीड वर्षापासून फुगेवाडी येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत होती. त्यासाठी अनेकदा निवेदन दिले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून फुगेवाडीकरांचा प्रश्न मार्गी लागला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर काम सुरू करावे.
प्रा. मनोज वाखारे, स्थानिक नागरिक
महापालिका प्रशासनाकडून या कामासाठी आधीच बजेट मंजूर करण्यात आले होते. रेल्वे प्रशासनाची अंतिम मंजुरी प्रतीक्षेत होती. तीही आता मिळाली आहे. त्यामुळे या कामास गती मिळणार आहे. अंत्यसंस्काराच्या विधिसाठीची पायपीट थांबणार आहे.
प्रमोद ओंभासे, अभियंता महापालिका