

पिंपरी : एका महिलेने झोपेच्या दहा गोळ्या एकदम खाल्ल्या. मात्र, मरण्याची भीती वाटल्याने तिने घरमालकाला फोन करून हकिकत सांगितली. घरमालकाने इमारतीच्या सुरक्षारक्षकाला महिलेच्या मदतीला पाठविले. मात्र, गुंगीत असलेल्या महिलेवर सुरक्षारक्षकाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 26 जुलै रोजी मारूंजी येथे घडली. (Latest Pimpari chinchwad News)
गजानन (55, पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 46 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 16) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने नैराश्यातून 26 जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास झोपेच्या दहा गोळ्या खाल्ल्या. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर जिवाचे बरे वाईट होईल या भीतीने त्यांनी घरमालकाला याबाबत मेसेज करून सांगितले. पाच ते दहा मिनिटांनी घर मालकांनी फोन करून रुग्णवाहिका पाठवत आहे. तुम्ही त्यासोबत जा, मी देखील येत आहे, असे सांगितले. त्यानंतर साडेबारा वाजता दरवाजाची बेल वाजली. त्या वेळी इमारतीचा सुरक्षा रक्षक आला. त्याने घरमालकाने तुमच्या मदतीला पाठविले आहे, असे सांगितले. मात्र, अचानक चक्कर आल्याने फिर्यादी या बेडरूममध्ये बेशुद्ध झाल्या. काही वेळाने त्यांना जाग आली असता आरोपी पीडित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. त्यांनी आरोपीला बेडवरून खाली ढकलले. त्यानंतर लगेचच पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.