

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सन 1982-83 ते मार्च 2024 पर्यंत विविध विभागांचे लेखा परीक्षण करण्यात येत आहे. यामध्ये प्रलंबित आक्षेपांची संख्या, वसूलपात्र रकमा, रेकॉर्ड उपलब्ध न झालेले आक्षेप मोठ्या प्रमाणावर आहेत. मागील दहा ते पंधरा वर्षाचे लेखापरीक्षण अद्याप बाकी आहे. तब्बल पाच हजार सातशे 68 कोटी 13 लाख 80 हजार 829 रुपयांचे लेखापरीक्षणाचे रेकॉर्ड तपासणीसाठी उपलब्ध झाले नसल्याची बाब समोर आली आहे. त्या फायली गायब झाल्याचे सांगितले जात आहे.
महापालिकेच्या विविध विभागांचे आर्थिक वर्षानुसार लेखा परीक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार, आतापर्यंत सन 1982-83 ते सन 2009-10 चे लेखा परीक्षण पूर्ण झाले आहे, तर सन 2010-11 ते सन 2023-24 चे एकत्रित लेखा परीक्षण सुरू आहे. त्यातील प्रलंबित आक्षेपांची संख्या, वसूलपात्र रकमा, रेकॉर्ड उपलब्ध न झालेले आक्षेप याविषयी कार्यवाही होत नाही. लेखा परीक्षण करण्यास विविध विभागप्रमुख सहकार्य करत नसल्याची तक्रार आहे. विभागप्रमुखांनी मोठ्या प्रकल्पांचे दडवलेले व गहाळ केलेल्या फाईली उपलब्ध होत नाहीत. फाईली गायब झाल्याने पाच हजार 768 कोटी 13 लाख 80 हजार 829 रुपयाचे लेखा परीक्षण अडकून पडले आहे; तसेच या कोट्यावधी रुपयांचा हिशेब लावणार कसा आणि फाईली गायब किंवा चोरीस कशा गेल्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेतील सर्वच विभागांचे 1982-83 आर्थिक वर्षांपासून झालेल्या लेखा परीक्षणात अनेक आक्षेप प्रलंबित आहेत. विभागप्रमुखांनी खर्च रकमेच्या फाईली उपलब्ध करून न दिल्यामुळे असंख्य आक्षेपाधीन प्रकरणे आढळून आली आहेत. सर्व विभागांना महिन्याभरात प्रलंबित आक्षेपांच्या फाईली उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, लेखा परीक्षण अपूर्ण राहत आहे. तसेच, लेखा विभागास सहकार्य न करणार्या संबंधित विभाग व अधिकार्यांवर कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे