पिंपरी/पवनानगर: यंदाच्या मान्सूनने पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणारे मावळ तालुक्यातील पवना धरण मंगळवारी (दि.24) 51.34 टक्के भरले आहे. त्यामुळे शहरवासीयांची किमान सहा महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.
दरवर्षी जुलै महिन्यात पवना धरण 50 टक्के भरते. तर, 15 ऑगस्टच्या सुमारास धरण 100 टक्के भरते. त्यानंतर अधिकच्या पाण्याचा विसर्ग गेला जातो. यंदा लवकर म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस मान्सून राज्यात दाखल झाला. (Latest Pimpri News)
सध्या पवना धरण आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे यंदा जून महिन्यातच धरण 50 टक्के भरल्याने शहराच्या पाणीसाठ्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत.
धरण मंगळवारी दुपारी चारपर्यंत 51.34 टक्के भरले आहे. मंगळवारी दिवसभरात 26 मिलिमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत एकूण 673 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. असाच पाऊस राहिल्यात जुलै महिन्यात धरण 100 टक्के भरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, धरणात पाणीसाठा वाढल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. विशेषतः शहराच्या वाढत्या लोकसंख्येसह भोसरी, चाकण, तळेगावड औद्योगिक क्षेत्रातही यामुळे दिलासा मिळणार आहे. पावसाचे वेळेआधी झालेले आगमन आणि धरणातील पाणीसाठा ही शहरासाठी दिलासादायक बाब आहे.