Pimpri News: पिंपरी-चिंचवडमधील बीआरटी मार्ग होणार बंद?

बीआरटी मार्गास मर्यादा असल्याने बसचे प्रवासी मेट्रोकडे वळत असल्याचे चित्र आहे.
 Pimpri News
पिंपरी-चिंचवडमधील बीआरटी मार्ग होणार बंद?Pudhari
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटीएस मार्गावर पीएमपीएलकडून पुरेशा संख्येने बस उपलब्ध नाहीत. बसची संख्या वाढविण्याबाबत दुजाभाव केला जात आहे. बीआरटी मार्गास मर्यादा असल्याने बसचे प्रवासी मेट्रोकडे वळत असल्याचे चित्र आहे. परिणामी, पुणे शहराच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील बीआरटीला ब्रेक लावण्याची चर्चा सुरू आहे.

पुणे शहरात वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाल्याने नगर रस्ता, हडपसर तेथील बीआरटी काढून टाकण्यात आली आहे. त्याचा कित्ता गिरवत पिंपरी-चिंचवड शहरातीलही बीआरटीचा थाट बंद करण्याच्या हालचाली दिसत आहेत. अवजड वाहनांची धडक दिल्याने अनेक थांब्यांची दुरवस्था झाली आहे. (Latest Pimpri News)

 Pimpri News
Internatioanal Driving Permit: आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याचा टक्का वाढतोय; आरटीओ महसुलामध्ये वाढ

शहरात अनेक ठिकाणी अपघातामुळे बॅरिकेट्स तुटून पडले आहेत. बॅरिकेट्स दुरुस्त न केल्याने खासगी वाहनांची घुसखोरी वाढली आहे. या मार्गात विविध कामांसाठी खोदकाम केले जात आहे. महामेट्रोकडून बसथांबे तसेच, बॅरिकेट्सवर बुलडोजर फिरवले जात आहेत. दुरुस्तीसाठी मार्ग वारंवार बंद केला जातो. बसची संख्याही मर्यादित असल्याने नागरिकांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागते.

मुख्य रस्ते अडवून बीआरटी मार्ग तयार करण्यात आले आहेत. मात्र, त्या मार्गात बस दिसत नाही. अरूंद सर्व्हिस रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. बीआरटीमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासही अडथळा निर्माण होतो. बॅरिकेट्स व थांबे अनधिकृत फ्लेक्स लावण्याचे एक ठिकाण झाल्याने शहर विद्रुप होत आहे. थांब्यावरील हॅगिंग लिटर बिन्समध्ये (कचर्‍याचे डबे) कचरा साचून अस्वच्छता पसरत आहे. थांब्यांचे पत्र व साहित्य चोरील जाण्याचे प्रकार कायम आहेत.

पूर्वी असलेली चकाचक बीआरटी व थांबे आता घाणीची ठिकाणे झाली आहेत. शहरात बीआरटी केवळ शोभेसाठी असल्याची टीका होऊ लागली आहे. सर्व कारणांचा विचार केल्यास महापालिका व पीएमपीएल प्रशासनाकडून बीआरटी बंद करण्याचे हालचाली दिसत आहेत.

बीआरटी मार्ग बंद होण्याची कारणे

  • बीआरटी मार्ग व थांब्यांची वारंवार दुरुस्ती काम करणे

  • महापालिका व मेट्रोकडून थांबे तोडणे

  • बीआरटी मार्गात वारंवार खोदकाम करणे

  • तुटलेले बॅरिकेट्स दुरुस्त न करणे

  • बीआरटी मार्गासाठी पुरेसा प्रमाणात बस उपलब्ध नाहीत

  • बीआरटी मार्गावर खासगी वाहनांची घुसखोरी

  • महापालिका प्रशासन, पीएमपीएल, वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका

  • अस्वच्छ व धोकादायक बसथांबे

  • सीसीटीव्ही कॅमेरे व इतर अद्ययावत यंत्रणेची केवळ घोषणा

  • मेट्रो मार्ग सुरू झाल्याने सार्वजनिक वाहतुकीचा बसचा पर्याय बंदच्या हालचाली

 Pimpri News
Municipal Appeal: परिसरात पाणी साचू नये याची दक्षता घ्या; आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पालिकेचे आवाहन

महापालिकेकडून कोट्यवधीचा खर्च

महापालिकेकडून बीआरटी मार्ग व थांबे उभारण्यासाठी कोट्यवधीचा खर्च झाला आहे. नाशिक फाटा उड्डाण पूल तसेच, सेंट मदर टेरेसा उड्डाण पुलावर कोटी ते दीड कोटी रुपये खर्च करून थांबे उभारले आहेत. मार्ग व थांबे देखभाल आणि दुरुस्तीवर तसेच, डांबरीकरणावर सातत्याने कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. बस खरेदीसाठी महापालिकेकडून पीएमपीएलला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात आहे. कोट्यवधी खर्च करूनही नागरिकांना जलद बस वाहतुकीची सेवा मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बीआरटी अधिक सक्षम करणार

शहरात बीआरटीला चांगला प्रतिसाद आहे. केएसबी चौक, चिंचवड-डांगे चौक-हिंंजवडी, भोसरी ते निगडी, टेल्को रस्ता, आळंदी-मोशी-चिखली-देहू, नाशिक फाटा-मोशी या नव्या मार्गावर बीआरटी सुरू करण्याचे नियोजन आहे. बीआरटी व मेट्रोचे प्रवासी वेगवेगळे आहेत. परवडेल व सोईस्कर अस पर्याय नगरिक निवडतात.

बीआरटी मार्ग व थांब्यांची दुरस्तीसाठी काही काळ मार्ग बंद ठेवला जातो. महापालिका, पीएमपीएल, वाहतूक पोलिस, राज्य शासन आदी संबंधित यंत्रणेकडे बीआरटी बंद करण्याचा सध्या तरी कोणत्याही प्रस्ताव विचारधीन नाही. महापालिकेकडून बीआरटी अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनी खासगी वाहने वापरण्यापेक्षा बस व मेट्रोचा वापर करून प्रदूषण कमी करण्यास हातभार लावला, असे महापालिकेच्या शहर दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.

बीआरटीचे केवळ पाच मार्ग

दापोडी ते निगडी, सांगवी फाटा ते किवळे, काळेवाडी फाटा ते चिखली, दिघी ते आळंदी, नाशिक फाटा ते वाकड या पाच मार्गावर बीआरटी सुरू आहे. मात्र, बसच्या फेर्‍या कमी असल्याने नागरिक त्रस्त आहेत. तर, निगडी, भक्ती-शक्ती ते किवळे हा मार्ग बंद आहे.

अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीत भर

प्रशस्त रस्त्यांवर बीआरटीचा मार्ग तयार केल्याने सर्व्हिस रस्त्याची रुंदी कमी होत आहे. त्यात महापालिका अर्बन स्ट्रीट डिजाईन ही जागतिक पातळीवरील संकल्पना राबवित आहे. त्यात रस्ते अरुंद करून पदपथ व सायकल ट्रॅक उभारले जात आहेत. रस्ते आणखी अरुंद होत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तसेच, पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने शहर जलमय होत आहे.

मेट्रो मार्गावर बस धावणार नाही ?

शहरात दापोडी ते निगडी मेट्रो सुरू होत आहे. त्याच मार्गावर 12.50 किलोमीटर अंतराचा दुहेरी बीआरटी मार्ग आहे. त्यामुळे सर्व्हिस रस्त्यांची जागा मोठ्या प्रमाणात अडवली गेली आहे. मेट्रो प्रवासाला नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. मेट्रोची सार्वजनिक वाहतूक विनाअडथळा व नफ्यात सुरू रहावी म्हणून त्या मार्गावरील बीआरटी सेवा बंद करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे.

बीआरटी मार्ग मात्र बस नाही

शहरात सध्या पाच ठिकाणी बीआरटी मार्ग आहे. महापालिकेने कोट्यवधी खर्च करून थांबे व मार्ग तयार केले आहेत. असे असताना पीएमपीएलकडून बसफेर्‍या वाढविण्याबाबत उदासीनता दाखविली जात आहे. बसच्या फेर्‍या कमी असल्याने बसची खूप वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे बीआरटी सेवेचा उद्देश सफल होत नसल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news